मुंब्य्रात दलदलीत संक्रमण शिबिर

By Admin | Updated: August 14, 2014 00:30 IST2014-08-14T00:30:43+5:302014-08-14T00:30:43+5:30

भविष्यात शीळफाट्यासारखी घटना घडली तर तेथील रहिवाशांना त्याच ठिकाणी निवारा उपलब्ध व्हावा, यासाठी आता बीएसयूपीच्या टप्पा-१ अंतर्गत साडेदहा कोटी खर्चून २८० खोल्यांचे संक्रमण शिबिर उभारले जाणार

Mumbra's Moorish transit camp | मुंब्य्रात दलदलीत संक्रमण शिबिर

मुंब्य्रात दलदलीत संक्रमण शिबिर

अजित मांडके, ठाणे
भविष्यात शीळफाट्यासारखी घटना घडली तर तेथील रहिवाशांना त्याच ठिकाणी निवारा उपलब्ध व्हावा, यासाठी आता बीएसयूपीच्या टप्पा-१ अंतर्गत साडेदहा कोटी खर्चून २८० खोल्यांचे संक्रमण शिबिर उभारले जाणार आहे. संतापाची बाब म्हणजे हे संक्रमण शिबिर दलदलीच्या जागेवर बांधण्यात येणार असून दलदलीमुळे त्याचा खर्च अडीच कोटींनी वाढला आहे़ यामुळे धोक्याच्या इमारतींतून या दलदलीच्या जागेत राहण्यास जाणाऱ्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात तर जाणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे़
अतिधोकादायक, धोकादायक आणि अनधिकृत इमारतींची संख्या अधिक आहे. त्यात शीळफाटा इमारत दुर्घटनेनंतरही अनेक इमारती पडल्या आहेत. त्यानंतर, येथे बेघर होणाऱ्या कुटुंबांना ठाण्यातील वर्तकनगर येथील दोस्तीच्या रेंटल हाऊसिंगमध्ये तात्पुरत्या स्वरूपात निवारा दिला जात आहे.
त्यानुसार, आता पालिकेने बीएसयूपीच्या टप्पा-१ अंतर्गत संक्रमण शिबिर बांधण्याचे निश्चित केले आहे. संक्रमण शिबिरांंतर्गत जेएनएनयूआरएमअंतर्गत आठ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुंब्य्रातील शिवाजीनगर तलावाजवळ असलेल्या मोकळ्या भूखंडावर संक्रमण शिबिरांतर्गत २८० खोल्या उभारल्या जाणार आहेत. याचा लाभ भविष्यात होणाऱ्या बीएसयूपी योजना, क्लस्टर अथवा पावसाळ्यात अचानकपणे धोकादायक इमारतींच्या पडण्याच्या होणाऱ्या घटना लक्षात घेऊन त्यासाठी या खोल्या उपयोगी ठरणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. दरम्यान, या तलावाजवळ काम करण्यास सुरुवात केली असता तेथे दलदल असल्याने त्या ठिकाणी पाईल फाउंडेशन पद्धतीने इमारतीचा पाया बांधणे गरजेचे ठरले आहे. परंतु, यामुळे खर्चात वाढ होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार, खर्चात सुमारे अडीच कोटींची वाढ झाली आहे. या वाढीव खर्चाला मान्यता मिळावी म्हणून यासंदर्भातील प्रस्ताव २० आॅगस्टच्या होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. ठाण्यातील एका आमदाराच्या बालहट्टापायी उगाचच ‘संघर्ष’ नको म्हणून प्रशासनाने दबावापोटी हा प्रस्ताव आणल्याची चर्चा आहे़

Web Title: Mumbra's Moorish transit camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.