डोंबिवली - दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान रेल्वे मार्गालगत असलेल्या मुंब्र्याच्या डोंगरावर गेल्या ३५ ते ४० वर्षांत किमान दीड ते दोन हजार झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. या अतिक्रमणामुळे हा डोंगर कमकुवत झाल्याचे वनविभाग व रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यापैकी २०० झोपड्या पारसिक बोगद्यावर असून, हा बोगदाही धोकादायक अवस्थेत आहे.
भविष्यात या रेल्वेमार्गावरून लोकल जात असताना डोंगरावरील दगड, मातीचा लोंढा खाली कोसळला, तर मोठी दुर्घटना घडून हजारो लोकांचा जीव जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या डोंगरावरील झोपड्यांचे स्थलांतर करण्याच्या मागणीने आता पुन्हा जोर धरला आहे. मात्र, राजकीय विरोधामुळे येथील झोपड्यांवर कारवाई होत नसल्याची चर्चा आहे.
पारसिक बाेगद्यावरील अतिक्रमणे काढण्याला आ. आव्हाडांचा विराेधवन खात्याने पारसिक बोगद्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी ठाणे महापालिकेला वेळोवेळी सांगितले होते. मात्र, मुंब्रा - कळव्याचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी पारसिक बोगद्यावरील व मुंब्रा डोंगरावरील एकाही झोपडीवर कारवाई झाली तर तीव्र आंदोलन करू, रेल्वे वाहतूक रोखू, असा इशारा दिला होता. त्यामुळे झोपड्या हटवण्याची कारवाई मागे पडली. शेवटी रेल्वेने पारसिक बोगद्यातील वाहतूकच थांबविली. मुंब्र्याच्या डोंगरावर झोपड्या असल्याने त्याला संरक्षित जाळ्या बसवणेही शक्य नाही. एका बाजूला मुंब्र्याचा डोंगर, दुसरीकडे खाडी व त्यामधून रेल्वेची वाहतूक होते. येथे दुर्घटना झाली तर हजारो लोक दगड, मातीत गाडले जातील, असे रेल्वे अधिकारी दबक्या आवाजात सांगतात.
पारसिक बोगदा अहोरात्र सुरू असलेल्या रेल्वे गाड्यांच्या वाहतूक स्पदनांनी धोकादायक झाल्यानंतर तेथून प्रवासी वाहतूक बंदच केली. जलद, धिम्या चारही मार्गिका जेथून जातात. त्यालगत असलेल्या डोंगरावरील झोपड्यांतून सांडपाणी वर्षानुवर्षे पाझरून डोंगराची माती, दगड भुसभुशीत झाल्याचे संबंधित अधिकारी सांगतात. मुंब्र्याचा डोंगर किंवा त्याचा काही भाग ढासळला तर मात्र मोठा अपघात होईल, अशी भीती आहे.
पारसिक बोगद्यात अपघात होऊ नये, यासाठी रेल्वेने काळजी घेतली असली तरी नव्याने मार्गिका झाल्या, त्या ठिकाणी डोंगर खचण्याचा धोका कायम आहे. डोंगरावर सुरू असलेले अतिक्रमण हटवणे गरजेचे आहे, पाण्याचा निचरा होऊ नये, कचरा, अस्वच्छता या समस्यांसोबतच प्रवासी सुरक्षेला प्राधान्य द्यावे.- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संस्था