मुंबई : मुंब्रा रेल्वे दुर्घटनेला बुधवार, ९ जुलै रोजी एक महिना पूर्ण झाला असून, या घटनेबाबत अद्याप रेल्वेचा अहवाल पूर्ण झालेला नाही. या दुर्घटनेचा तपास करण्यासाठी १२ जून रोजी समिती स्थापन करण्यात आली असली तरी तिच्या माध्यमातून मिळणार असलेला अहवाल अद्याप अपूर्ण आहे. या दुर्घटनेमध्ये पाच प्रवाशांचा मृत्यू आणि आठ प्रवासी जखमी झाले होते. एका महिन्यानंतर ही रेल्वे दुर्घटना कशी घडली याचे ठोस कारण मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाला सापडलेले नाही.
मुंब्रा दुर्घटनेचा तपास करण्यासाठी मध्य रेल्वेने पाच सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीच्या माध्यमातून अहवाल अद्याप जाहीर झाला नाही. समितीने २४ जून रोजी दिलेल्या प्राथमिक निष्कर्षात दुर्घटनेचे खापर प्रवाशांवर फोडल्याचे दिसून आले. कर्जतला जाणाऱ्या लोकलमधून खांद्यावर बॅग असलेला प्रवासी तोल गेल्याने सर्वप्रथम पडला. त्याचा धक्का लागून त्याच डब्यातील आणखी एक प्रवासी पडला. दोघे प्रवासी कसारा-सीएसएमटी लोकलमधील प्रवाशांवर आदळले होते.
विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्हप्राथमिक निष्कर्षाला पंधरा दिवस होऊनही मध्य रेल्वेच्या समितीने अंतिम अहवाल जाहीर केलेला नाही. यामुळे समितीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच मुंबई लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी स्वतंत्र चौकशी समितीची घोषणा केल्यानंतर त्यांच्या प्राथमिक अहवालही जाहीर झाला नाही.
मुंब्रा घटनेबाबतचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू असून, तो अंतिम टप्प्यात आहे. - पी. डी. पाटील, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे