Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांची सावली गुरुवारी होणार अदृश्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 02:09 IST

मुंबईकरांना १६ मे रोजी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी आपली सावली अदृश्य झाल्याचा अनुभव घेता येईल, असे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

मुंबई : मुंबईकरांना १६ मे रोजी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी आपली सावली अदृश्य झाल्याचा अनुभव घेता येईल, असे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.सोमण म्हणाले की, उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकरवृत्त यामधील प्रदेशातच सूर्य आकाशात बरोबर डोक्यावर आल्याने वर्षातून दोन वेळा शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. आपण असतो, त्या स्थळाचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती ज्यादिवशी सारखी होते, त्याच दिवशी दुपारी मध्यान्हाला सूर्य आकाशात ठीक डोक्यावर येतो. मुंबईचे अक्षांश उत्तर १९ अंश आहेत. १६ मे रोजी सूर्याची क्रांती उत्तर १९ अंश होणार असल्याने, दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी सूर्य आकाशात ठीक डोक्यावर येईल आणि मुंबईकरांना शून्य सावलीचा अनुभव घेता येईल. ठाणे, बोरीवली, डोंबिवली, कल्याणकरांना १७ मे रोजी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी शून्य सावली अनुभवता येईल.

टॅग्स :मुंबई