मुंबई - मुंबईतील उपप्रादेशिक (आरटीओ) कार्यालयांनी गेल्या वर्षभरात तीन लाख २१ हजार ड्रायव्हिंग लायसन्स दिले आहेत. त्यापैकी सर्वाधिक लायसन्स मुंबई सेंट्रल आरटीओ कार्यालयाने वितरित केले आहेत.
कोणतेही वाहन चालवण्यासाठी योग्य प्रशिक्षणासह लायसन्स आवश्यक आहे. आरटीओकडून त्यासाठी लर्निंग लायसन्सची ऑनलाइन परीक्षा आणि त्यानंतर प्रत्यक्ष गाडी चालवण्याची परीक्षा घेतली जाते. त्यात उत्तीर्ण होणाऱ्यांना पक्के ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाते. मुंबईतील चार प्रमुख आरटीओ कार्यालयांनी वर्षभरात तीन लाखांपेक्षा अधिक हलक्या आणि अवजड तसेच इतर वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनचालकांसाठी लायसन्स दिले आहे.
वाहनचालकांनी नियमांचे पालन करून जबाबदारीने वाहने चालवावी, असा संदेश आरटीओ अधिकाऱ्यांनी दिला आहे. वाहन वाढत्या संख्येमुळे वाहतूक समस्या आणि अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे योग्य प्रशिक्षण आणि नियमांचे पालन अत्यावश्यक आहे. येत्या काळात राज्यात ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक तयार करण्यात येणार असून, उमेदवारांचे मूल्यमापन अधिक चांगले केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.