मुंबई: मुंबईकरांच्या सेवेत नवी लोकल दाखल झाली आहे. आज पहिल्यांदा ही लोकल मुंबईकरांना घेऊन धावेल. सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणारी ही पहिली नॉन एसी लोकल असेल. सध्या धावत असणाऱ्या नॉन एसी लोकलच्या केवळ महिला डब्यांमध्येच सीसीटीव्ही आहेत. तर पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या एसी लोकलच्या सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणारी नॉन एसी पहिल्यांदाच मुंबईत धावेल.नव्या लोकलमध्ये अनेक उत्तम सोयीसुविधा असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी दिली. 'सध्या प्रायोगिक तत्त्वावर नवी लोकल चालवण्यात येईल. यानंतर प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊन पुढील उत्पादनाबद्दलचा निर्णय घेण्यात येईल,' असं भाकर म्हणाले. आज पहिल्यांदा ही लोकल मुंबईत धावेल. विशेष म्हणजे या रेल्वेतून प्रथम प्रवास करण्याची संधी महिलांना मिळेल. संध्याकाळी 6 वाजून 13 मिनिटांनी चर्चगेटहून सुटणारी लोकल 7 वाजून 57 मिनिटांनी विरारला पोहोचेल. ही लोकल लेडिज स्पेशल असेल. उद्यापासून नव्या लोकलच्या 10 फेऱ्या होतील.
सर्व डब्यांत सीसीटीव्ही, नवं डिझाईन अन् बरंच काही; मुंबईकरांची नवी लोकल लय भारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 16:00 IST