मुंबईचा पारा चढाच!

By Admin | Updated: August 26, 2014 01:54 IST2014-08-26T01:54:29+5:302014-08-26T01:54:29+5:30

विश्रांती घेतलेल्या पावसाचे मुंबई शहर आणि उपनगरात दमदार पुनरागमन झाल्यानंतर ३१ अंशांवर चढलेला कमाल तापमानाचा पारा खाली येईल

Mumbai's mercury stabbed! | मुंबईचा पारा चढाच!

मुंबईचा पारा चढाच!

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाचे मुंबई शहर आणि उपनगरात दमदार पुनरागमन झाल्यानंतर ३१ अंशांवर चढलेला कमाल तापमानाचा पारा खाली येईल, असा अंदाज असतानाच वातावरणात होत असलेले बदल, कमी दाबाच्या क्षेत्रात होत असलेल्या वातावरणीय हालचाली आणि पावसाची उघडझाप; या सर्व कारणांमुळे जलधारांनंतरही मुंबईचा पारा चढाच असल्याचे चित्र आहे.
आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत दमदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा जोर ओसरला. आता कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव कमी झाल्याने पाऊस पुन्हा एकदा मुंबईत सक्रिय झाला आहे. आॅगस्ट महिन्याच्या मध्यंतरीही पावसाने उघडीप दिल्याने शहराचा कमाल तापमानाचा पारा ३२ अंशांवर पोहोचला होता. तत्पूर्वी जुलै महिन्याच्या शेवटी दमदार पाऊस पडल्याने कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात येत होते.
आॅगस्टच्या शेवटी पाऊस परतल्याने कमाल तापमानाचा पारा खाली घसरेल, असा अंदाज होता. परंतु वातावरणीय बदलामुळे शहराचा कमाल तापमानाचा पारा ३१ आणि किमान तापमान २५ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. दरम्यान, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तिन्ही दिवशी सलग पावसाने जोर धरल्यानंतरही शहरातला उकाडा कायम असून, सकाळ आणि सायंकाळ वगळता दुपारी मुंबईकरांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य पूर्व अरबी समुद्र व लगतच्या महाराष्ट्र व कर्नाटक किनारपट्टीवर असलेले कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले आहे. समुद्रसपाटीवर दक्षिण महाराष्ट्र ते केरळच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पावसाचा मारा सुरू आहे. शिवाय पुढील ४८ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मुंबईत पावसाच्या काही सरी मेघगर्जनेसह कोसळण्याची शक्यता असून, कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१, २६ अंशांच्या आसपास राहील. (प्रतिनिधी)

Web Title: Mumbai's mercury stabbed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.