Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचा पारा चढतोय; कमाल तापमान ३३ ते ३५ अंशांच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 06:51 IST

मुंबईचे कमाल तापमान शनिवारी ३३.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, उत्तरोत्तर त्यात वाढ होत आहे.

मुंबई : मुंबईचे किमान तापमान २० अंशांखाली नोंदविण्यात येत असून, शनिवारी कांदिवली १७.८, बोरीवली १४.३, पवई १६.५ आणि पनवेलचे किमान तापमान १६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. किमान तापमान मुंबईकरांना दिलासा देत असले तरीदेखील कमाल तापमान मुंबईकरांचा घाम काढत आहे. कारण मुंबईचे कमाल तापमान शनिवारी ३३.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, उत्तरोत्तर त्यात वाढ होत आहे. परिणामी रात्र किंचित गार तर दिवस कमालीचा गरम वातावरणाचा असल्याने मुंबईचा पारा दिवसागणिक वाढतच आहे.राज्यात गेल्या २४ तासांत हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात आणि मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.गोव्यासह संपूर्ण राज्यात २६ फेब्रुवारी रोजी हवामान कोरडे राहील. रविवारसह सोमवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, १९ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.