Join us  

मुंबईचा पारा चढला; तापमान ३८ अंशांपेक्षा अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2021 6:57 AM

अकाेला, चंद्रपूरला ‘हीट अलर्ट’. तीन दिवसांपासून विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत तापमान सामान्यपेक्षा अधिक आहे. थंडी गेल्यानंतर लगेच उन्हाचे चटके बसू लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाच्या कडाक्याने नागरिक हैराण झाले आहेत. तापमानामध्ये सामान्यपेक्षा ३ ते ५ अंशांची वाढ झाली आहे. गुरुवारी मुंबईचे कमाल तापमान ३८.१ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. ठाणे, नवी मुंबई, रायगड येथील पाराही वाढला आहे. विदर्भातील अकाेला, वाशिम आणि चंद्रपूरला हवामान विभागाने हीट अलर्ट जारी केला आहे.

तीन दिवसांपासून विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत तापमान सामान्यपेक्षा अधिक आहे. थंडी गेल्यानंतर लगेच उन्हाचे चटके बसू लागले आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते अशाप्रकारची एकदम वाढलेली उष्णता याआधी अनुभवलेली नाही. सर्वाधिक ३९.८ अंश सेल्सिअस तापमान ब्रह्मपुरी येथे नाेंदविण्यात आले. त्या खालाेखाल चंद्रपूरमध्ये ३९.२, अकाेल्यामध्ये ३९.१ तर वाशिममध्ये ३८ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नाेंद करण्यात आली. हवामान विभागाने या तिन्ही ठिकाणी काही भागांत उष्ण लहर (हीट वेव्ह) येण्याच्या सतर्कतेचा इशारा दिला आहे. मात्र, उष्ण लहरींची तीव्रता अधिक नसून, फार धाेकादायक नसल्याचे विभागाचे म्हणणे आहे. तरी नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्याची सूचना केली आहे. पुढचे पाच दिवस तापमान असेच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने नाेंदविला आहे.

उष्ण वाऱ्यामुळे वाढले तापमान nहवामान विभागाचे संचालक एम. एन. साहू यांनी सांगितले, सध्या राजस्थान व गुजरातकडून उष्ण वारे मध्य भारताकडे वाहत आहेत. त्यामुळे नागपूर व विदर्भाच्या तापमानात वाढ झाली आहे. nथंड किंवा उष्ण प्रदेशातून वाहणाऱ्या वाऱ्याचे इतर भागांत परिणाम हाेतात. वाऱ्याची दिशा बदलली की आपाेआप तापमान खाली येईल, असा दावा त्यांनी केला.

अरबी समुद्राहून मुंबईकडे वाहणारे वारे स्थिर होण्यास विलंब होत आहे. हे वारे दुपारी स्थिर होत असल्याने या तप्त वाऱ्यांमुळे मुंबईच्या तापमानात वाढ होत आहे.- शुभांगी भुते, शास्त्रज्ञ

ठाणे @ ४०गेल्या काही दिवसांतील ठाणे शहरातील तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअस पर्यंत गेल्याचे दिसून आले आहे. महापालिकेकडील नोंदी नुसार गुरुवारी दुपारी २.३० च्या सुमारास ठाण्याचा पारा ४० अंश सेल्सिअसवर गेला होता.

टॅग्स :उष्माघात