मुंबईच्या कमाल तापमानात वाढ, कमाल तापमान २८ अंशांवरून ३४ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:12 IST2021-01-13T04:12:57+5:302021-01-13T04:12:57+5:30
स्वच्छ सूर्यप्रकाश आणि मोकळे आकाश, मुंबईकरांनी सोडला सुटकेचा निःश्वास लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या आठवडाभरापासून मुंबईवर दाटून आलेले ...

मुंबईच्या कमाल तापमानात वाढ, कमाल तापमान २८ अंशांवरून ३४ अंशांवर
स्वच्छ सूर्यप्रकाश आणि मोकळे आकाश, मुंबईकरांनी सोडला सुटकेचा निःश्वास
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या आठवडाभरापासून मुंबईवर दाटून आलेले मळभ रविवारी हटले आणि दाखल झालेल्या स्वच्छ सूर्य प्रकाशामुळे मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला. रविवारी सकाळीच मुंबईकरांना सूर्यनारायणाचे दर्शन झाले. शिवाय दिवसभर मुंबईत आकाश मोकळे होते. प्रदूषणाचा विचार करता काही ठिकाणी प्रदूषणाचा स्तर नोंदविण्यात येत होता. हिवाळ्यात अशा प्रकारचे प्रदूषण नोंदविण्यात येते, अशी माहिती हवामान खात्याने दिल्याने आणखी काही दिवस मुंबईकरांना प्रदूषणाचा सामना करावा लागणार आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. हे कमाल तापमान २८ वरून ३४ अंशांवर दाखल झाले आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रोहा, रायगड येथे काही प्रमाणात ढगाळ हवामान नोंदविण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईच्या तापमानाचा विचार करता किमान तापमानात फार काही बदल झाला नाही. मात्र कमाल तापमानात मोठे बदल झाले आहेत. कमाल तापमान २८ अंशांहून ३३ अंशांवर दाखल झाले आहे. शिवाय मुंबईतील ढगाळ हवामान हटले असून, आकाश मोकळे झाले आहे आणि स्वच्छ सूर्यप्रकाशदेखील पडला आहे. शिवाय राज्यात काही ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. हे किमान तापमान १८ अंशांच्या आसपास नोंदविण्यात आले आहे, तर गेल्या २४ तासांत काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.