मुंबईत अश्मयुगीन मानवाचे अस्तित्व अधोरेखित!
By Admin | Updated: July 20, 2016 02:26 IST2016-07-20T02:26:38+5:302016-07-20T02:26:38+5:30
मुंबईची आतापर्यंतची ओळख बदलणारे आणि शहराचा इतिहास थेट अश्मयुगापर्यंत घेऊन जाणारे पुरावे नव्या संशोधनातून पुढे येत आहेत.

मुंबईत अश्मयुगीन मानवाचे अस्तित्व अधोरेखित!
संकेत सातोपे,
मुंबई- ब्रिटीश आणि पोर्तुगीजांनी वसविलेले महानगर, अशी मुंबईची आतापर्यंतची ओळख बदलणारे आणि शहराचा इतिहास थेट अश्मयुगापर्यंत घेऊन जाणारे पुरावे नव्या संशोधनातून पुढे येत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाला विभागाकडून करण्यात आलेल्या संशोधनात तुळशी तलाव परिसरात आणि मुलुंडजवळच्या खिंडीपाडा भागात अनेक दगडी हत्यारे सापडली असून ती अश्मयुगीन मानवाची असल्याचा प्राथमिक अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
पाणीकपातीमुळे निराश झालेल्या मुंबईकरांना तुळशी तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाल्याच्या बातमीने दिलासा मिळाला असतानाच अजून एका आनंदाच्या बातमीची भर पडली आहे. तुळशी तलाव परिसरात तब्बल ३० हजार वर्षे जुनी अश्मयुगीन मानवाची दगडी हत्यारे मुंबई विद्यापीठाच्या चमुला सापडली. या हत्यारांबाबत या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत मागविण्यात आले असून त्यानंतर या संशोधनावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे, असे मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाला विभागाच्या प्रमुख मुग्धा कर्णिक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
दरम्यान, याच चमुला बीएआरसीच्या आवारात नुकत्याच सापडलेल्या १४ व्या शतकातील शिलालेखातून मुंबईचे प्राचीन नाव बिंबस्थान असल्याचे स्पष्ट झाले होते. भारतीय पुरातत्त्व विज्ञानाचे पितामह डॉ. सांकलिया यांना काही वर्षांपूर्वी अश्मयुगीन मानवाची काही हत्यारे मुंबईतील कांदिवली भागात सापडली होती. त्यानंतर आता पुन्हा प्राचीन हत्यारेही सापडल्यामुळे मुंबईचा अश्मयुगीन इतिहास अधोरेखित झाला आहे.
प्राचीन मुंबईचा शोध घेण्यासाठी विद्यापीठाच्या बहि:शाला विभागाने पाच तज्ज्ञांचा समावेश असलेली पाच पथके नेमली असून त्यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी संशोधन सुरू आहे. डॉ. कुरुष दलाल, डॉ. सुरज पंडित, डॉ. प्राची मोघे, डॉ. अभिजित दांडेकर आणि विनायक परब यांच्या नेतृत्वाखाली २५ जणांचा चमू शोधकार्यात जुंपला आहे. महिकावतीच्या बखरीमध्ये मरोळ आणि माहीम या भागांचा उल्लेख प्रामुख्याने आढळतो, त्यामुळे याच परिसरातून गेल्या काही महिन्यांपासून संशोधनाला सुरुवात करण्यात आली असून त्यातून अनेक रंजक गोष्टी समोर आल्या आहेत. सध्या पावसाळ्यामुळे प्रत्यक्ष संशोधनकार्य थांबविण्यात आले असले, तरीही आतापर्यंतच्या संशोधनातून मिळालेल्या गोष्टींची पडताळणी करणे, त्यावर अभ्यास करणे आदी कामे सुरू आहेत. हिवाळ्यादरम्यान संशोधन पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे डॉ. कर्णिक यांनी सांगितले.
‘आरे कारशेडमुळे मुंबईचा इतिहास गाडला जाईल’
मरोळ, आरे कॉलनी हा तत्कालीन राजधानीचा परिसर होता. या भागात अनेक पुरातत्वीय अवशेष सापडतात. आरे कॉलनीतील उलटन पाडा, बांगाडा, मरोशी पाडा, मटई, सारंगदेव, केल्टीपाडा या गावांमध्ये आमच्या चमूने संशोधन केले. त्यात येथे प्राचीन मंदिरांचे अवशेष आढळून आले. येथील एक गावदेवीही १२-१३ व्या शतकातील आहे. तसेच येथे किचकाच्या एका प्राचीन मूर्तीची पूजा लोक गणपती म्हणून करीत असल्याचेही दिसले. या पुढील संशोधनासही येथे मोठ्या प्रमाणात वाव आहे. मात्र पुरातत्त्व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाविना येथे मेट्रो प्रस्तावित कारशेड उभारल्यास मुंबई सोनरी इतिहासच गाडला जाण्याची शक्यता आहे, असे इतिहास संशोधन विनायक परब यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
।नव्या कायद्याची आवश्यकता
पुरातत्वीय अवशेषांची वाताहत होऊ नये, यासाठी युरोप- अमेरिकेत सरकारने विशेष काळजी घेतली आहे. कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी अन्य परवानग्यांप्रमाणेच तेथे पुरातत्वीय विभागाचीही परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. अशा स्वरूपाचा कायदा भारतातही होण्याची आवश्यकता असल्याचे मत विनायक परब यांनी व्यक्त केले.