Join us  

'त्या' बसेस पुन्हा सेवेत येणार; गारेगार प्रवास आता खिशाला परवडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 6:55 AM

वातानुकूलित बसेस पुन्हा धावणार; बेस्ट उपक्रम लवकरच खरेदी करणार चारशे गाड्या

मुंबई : दोन वर्षांच्या ब्रेकनंतर वातानुकूलित बसगाड्या पुन्हा मुंबईच्या रस्त्यांवर धावताना दिसणार आहेत. बेस्ट उपक्रम लवकरच चारशे वातानुकूलित बसगाड्या भाडेतत्त्वावर घेणार आहे. विशेष म्हणजे किमान सहा ते २५ रुपयांमध्ये मुंबईकरांना गारेगार प्रवासाचा आनंद घेता येईल.

बेस्ट उपक्रमाने २००९ मध्ये वातानुकूलित बसेस खरेदी केल्या. खासगी वाहनांतून फिरणाऱ्या प्रवाशांना लक्ष्य करीत ही सेवा सुरू केली होती. तिकिटांचे दर जास्त असल्याने सुरुवातीपासूनच या सेवेला अल्प प्रतिसाद मिळाला. या बसेसच्या देखभालीचा खर्च वाढत गेला आणि सेवा तोट्यात गेली. त्यामुळे वातानुकूलित बसेस बेस्ट उपक्रमासाठी पांढरा हत्ती ठरूलागल्या. अखेर एप्रिल २०१७ मध्ये वातानुकूलित बस मार्ग बेस्ट प्रशासनाने रद्द केले.

मात्र पालिका प्रशासनाच्या अटीनुसार बसभाड्यात कपात करताना वातानुकूलित बसेसचे तिकीट दरही कमी केले आहेत. मंगळवारपासून लागू झालेल्या तिकिटांच्या नवीन दरानुसार वातानुकूलित बसेसचे किमान भाडे अवघे सहा रुपये केले आहे. दर कमी झाल्यावर प्रवासी वाढतील म्हणून बसेसची संख्याही वाढविण्यात येईल. ऑगस्टमध्ये पहिल्या टप्प्यात दोनशे वातानुकूलित बसेस ताफ्यात येतील. उर्वरित नोव्हेंबरपर्यंत येणार आहेत.

आणखी एसी बस घेणारसध्या २५ वातानुकूलित बस वांद्रे-कुर्ला संकुल या मार्गावर आहेत. मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडून मिळालेल्या बसेस या मार्गावर धावतात. सध्या चारशे वातानुकूलित बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात येतील. तसेच प्रवाशांचा प्रतिसाद पाहून एसी बसेसची संख्या एक हजारपर्यंत वाढविण्यात येणार आहे.पुढच्या महिन्यात एसी प्रवासअ‍ॅण्टनी गॅरेज आणि श्री कृपा सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांकडून प्रत्येकी दोनशे एसी बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ऑगस्ट महिन्यात काही एसी बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात येणार आहेत. 

वार्षिक ३६० कोटींचे नुकसान२००८-०९ मध्ये ४५, २००९-१० मध्ये २००, २०१० मध्ये १२ व दोन अशा २५९ वातानुकूलित बसेस बेस्टने घेतल्या. त्यांची किंमत प्रत्येकी ५५ ते ६५ लाख होती. तर, आयुर्मान आठ वर्षे होते. मात्र यातून रोज केवळ १८ ते २० हजार प्रवासीच असत. तसेच गाड्या नादुरुस्त होणे, वारंवार बंद पडणे असे प्रकार घडू लागले. इंजीनमध्ये बिघाड होऊन गाडीला आग लागण्याच्या घटनाही घडल्या. या बस सेवेतून वार्षिक ३६० कोटींचे नुकसान होत होते. तरीही प्रतिष्ठेचा मुद्दा करीत हे बसमार्ग १० वर्षे सुरू राहिले.

टॅग्स :बेस्ट