मुंबईची गोविंदा पथके ठाण्यात जाणारच!
By Admin | Updated: September 6, 2015 03:09 IST2015-09-06T03:09:55+5:302015-09-06T03:09:55+5:30
दहीहंडीच्या वादंगामुळे ठाणे दहीहंडी समितीने मुंबईच्या गोविंदा पथकांना ठाण्यात न येण्याचे आवाहन केले होते. मात्र ठाणेकरांचे हे आवाहन पायदळी तुडवत उद्या (रविवारी) मुंबईची गोविंदा

मुंबईची गोविंदा पथके ठाण्यात जाणारच!
मुंबई : दहीहंडीच्या वादंगामुळे ठाणे दहीहंडी समितीने मुंबईच्या गोविंदा पथकांना ठाण्यात न येण्याचे आवाहन केले होते. मात्र ठाणेकरांचे हे आवाहन पायदळी तुडवत उद्या (रविवारी) मुंबईची गोविंदा पथके ठाण्यातच हंड्या फोडण्यास जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर उत्सवाकरिता मुंबई पोलिसांनी विशेष बंदोबस्त केला आहे.
ठाण्याच्या उत्सवावर तेथील गोविंदा पथकांनी बहिष्कार घातल्याने मुंबईकरांनीही ठाण्यात येऊ नका, असे आवाहन ठाणे समन्वय समितीने केले होते. मात्र असे असूनही काही मुंबईकर गोविंदा पथके ठाण्यात जाऊन हंडी फोडणार आहेत. उत्सवाच्या दिवशी अशी परिस्थिती उद्भवल्यास वातावरणात काहीसा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
न्यायालयाचे निर्बंध, आयोजकांची माघार, राज्य शासनाची उदासीनता अशा ‘त्रिसूत्री’त अडकलेल्या गोविंदाने अखेर उत्सव गेल्या वर्षीप्रमाणेच साजरा करण्याचा निर्धार केला. मात्र प्रसिद्ध आयोजकांनी हंड्या रद्द केल्यानंतरही मुंबई शहर - उपनगरात तब्बल ३ हजार ४७० हंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील ८०० हंड्या प्रमुख असून, ४०४ राजकीय नेत्यांच्या हंड्या आहेत. यामध्ये ५० हजार ते १ लाख एवढ्या रकमेचे बक्षीस असणाऱ्या ९६ हंड्या आहेत. तर एक लाखाहून अधिक बक्षीस असणाऱ्या तब्बल ९२ हंड्यांचे आयोजन शहर-उपनगरात करण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई पोलीस दलाचे प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
उत्सवाच्या वादावर शासनाकडून सकारात्मक भूमिका मांडत आमदार आशिष शेलार यांनी गोविंदा पथकांना दिलासा दिल्याने काहीशी धाकधूक कमी आहे. शिवाय, उत्सवाला गालबोट न लावता जोश-जल्लोषात दहीहंडी साजरी करण्याचा निर्धार गोविंदा पथकांनी केला आहे. (प्रतिनिधी)
दहीहंडीसाठी रुग्णालये सज्ज
दहीहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदांना तत्काळ मदत मिळावी म्हणून रुग्णालये सज्ज झाली आहेत. दहीहंडी उत्सव साजरा करताना नियमांचे पालन केले नाही, तर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
यामुळे यंदाचा उत्सव साजरा कसा करायचा? कोणत्या नियमांचे पालन करायचे? अशा अनेक वादात दहीहंडी उत्सव अडकला होता. पण या सर्वांवर मात करून उद्या रविवारी उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे. पण उत्साहात गोविंदा अथवा नागरिक जखमी झाल्यास शहरातील महापालिका आणि सरकारी रुग्णालये सज्ज झाली आहेत.
महापालिकेच्या नायर, केईएम आणि सायन या प्रमुख तीन रुग्णालयांच्या बरोबरच सरकारी जे.जे. रुग्णालयात आपत्कालीन विभागात डॉक्टरांचा चमू तैनात करण्यात आला आहे. यात आॅर्थोपेडिक्स, नेत्रचिकित्सा, सर्जरीच्या डॉक्टरांचा समावेश आहे. परिचारिका, वॉर्डबॉय यांनाही ड्युटी लावण्यात आली आहे. उपनगरीय रुग्णालयांमध्येही व्यवस्था करण्यात आली आहे.
किरकोळ जखमी गोविंदा आल्यास त्याच्यावर त्वरित उपचार व्हावेत म्हणून एक टीम तेथे कार्यरत असणार आहे. तर गंभीर जखमी गोविंदांना तपासण्यासाठी स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीम असणार आहे. प्लॅस्टर, इतर औषधांचा साठा करण्यात आल्याचे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.
सोशल मीडियावर ‘गोविंदा रे गोपाळा..’
एकीकडे दहीहंडी उत्सवाच्या वादाची चर्चा होत असताना दुसरीकडे सोशल मिडीयावर मात्र ‘गोविंदा रे गोपाळा..’ची धूम सुरु होती. कृष्ण जन्माष्टमीला सकाळपासूनच सोशल मिडियावर हंडीच्या आयोजनांची चर्चा आणि नव-नव्या पथकांच्या ग्रूप्सची मोर्चेबांधणी सुुरु होती.
फेसबुक, व्हॉट्सअपवर शनिवारी सकाळपासूनच रविवारचे प्लानिंग सुरु होते. तर गोविंदा पथकांतील तरुणाईमध्ये यंदाच्या उत्सवाविषयी उत्साह निर्माण करणारे संदेश आणि छायाचित्रांचेही
शेअरिंग सुरु होते. शिवाय, सोशल मिडीयावरील पथकांच्या आणि आयोजकांच्या पेजेसवर उत्सवाविषयी चर्चा सुरु होती. तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देणारे मेसेजेसचीही रीघ दिवसभर सोशल नेटवर्किंगवर दिसून आली.
सोशल मिडीयावर गेल्या वर्षी सर्वाधिक थर रचणाऱ्या पथकांचे व्हिडिओही वाऱ्याच्या वेगाने शेअर झाले. तसेच, काही उत्सवात गोविंदानी काळजी घ्यावी, उत्सवाचा बेरंग करु नये, थरांच्या स्पर्धेत सहभागी होऊ नयेत असे जनजागृतीपर संदेशही सोशल मिडीयावर शेअर होत होते.