येत्या दोन - चार वर्षांत मुंबईचे रुपडे पालटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:27 IST2021-02-05T04:27:39+5:302021-02-05T04:27:39+5:30
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास : स्वदेशी बनावटीच्या मेट्रो ट्रेनचे अनावरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : प्रत्येक दिवस विशेष ...

येत्या दोन - चार वर्षांत मुंबईचे रुपडे पालटणार
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास : स्वदेशी बनावटीच्या मेट्रो ट्रेनचे अनावरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रत्येक दिवस विशेष असतो. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण नवी मेट्रो मुंबईत दाखल झाली आहे. मेट्रो मुंबईचे आकर्षण आहे. मुंबई वाढते आहे. पसरते आहे. वाढत्या मुंबईला सामावून घेण्यासाठी आम्ही काम करत असून येत्या दोन - चार वर्षांत मुंबई बदलणार आहे. ती आखीव-रेखीव होईल. मुंबईचे रुपडे पालटेल. कारण बेस्ट बसची संख्या १० हजार होईल. मे महिन्यात मेट्रो सुरू होईल. कोस्टल रोडचे काम सुरू आहे. ही कामे पूर्ण करतानाच मागच्या सरकारने ज्या वेगाने काम केले त्यापेक्षा अधिक वेगाने काम करत नागरिकांच्या सेवेस उतरू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
बंगळुरू येथून मुंबईत दाखल झालेल्या मेट्रो ट्रेनचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी संध्याकाळी चारकोप डेपोमध्ये करण्यात आले. ब्रँडिंग मॅन्युअल, ट्रॅव्हल कार्ड, ऑपरेशनल कंट्रोल सेंट्रल, ग्रहण उप केंद्र, चारकोप आगार आणि रिसिव्हिंग सबस्टेशनचे उद्घाटनही या वेळी करण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले, मेट्रो २ - अ आणि ७ मुळे मुंबईचा वेग वाढेल. पर्याय मिळाल्याने लोकलवर येणारा ताण कमी हाेईल. प्रवाशांना पर्यायी वाहतूक उपलब्ध होईल. मेट्रो चालकविरहित असेल. मुंबईत जेवढी मेट्रोची कामे सुरू आहेत तेवढी जगाच्या पाठीवर कुठेही सुरू नाहीत.
* २०२६ पर्यंत सर्व मेट्रो प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन
आजचा दिवस मुंबईसाठी ऐतिहासिक, अभिमानाचा आहे. २००९ मध्ये मुंबईत पहिली मेट्रो आली. २०१४ मध्ये तिचे अनावरण झाले. त्यानंतर आज मुंबईत स्वदेशी मेट्रो दाखल झाली. २०२६ पर्यंत सर्व मेट्रो प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे ‘मुंबई इन मिनिट्स’ हे स्वप्न साकार होईल. मेट्रोमध्ये दीड लाख कोटींचा खर्च नियोजित आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सायकल सुरू केली आहे. इतर कामेही वेगाने सुरू आहेत.
- आर. ए. राजीव,
महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
* भविष्यात प्रवास होणार सुखकर
आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. मेट्रो सुरू झाली की इतर वाहतुकीवरील ताण कमी होईल. आता १४ मेट्रो मार्ग प्रस्तावित आहेत. यातील एक मार्ग कार्यान्वित झाला आहे. उर्वरित मार्गांची कामे सुरू आहेत. काही मेट्रोचे डीपीआर बनविण्याचे काम सुरू आहे. भविष्यात प्रवास सुखकर होईल. पर्यावरण संवर्धनास मदत होईल.
- एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री
* नवीन मेट्राेची काही वैशिष्ट्ये
- मेट्रो २ अ - दहिसर पूर्व ते डी. एन. नगर
- मेट्रो ७ - अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व
- स्वयंचलित पद्धतीने धावणार. सर्व कोच एसी, ऑटोमॅटिक दरवाजे.
- प्रत्येक डब्यात सीसीटीव्हीची नजर, ऑप्टिकल फायबरचे नेटवर्क.
- प्रत्येक डब्यात दोन सायकली ठेवण्याची व्यवस्था.
- दिव्यांगांना व्हीलचेअरसह प्रवास करण्यासाठी प्रत्येक डब्यात स्वतंत्र व्यवस्था.
- कमाल वेग मर्यादा ८० किमी प्रति तास.
- डब्यांचे डिझाईन ऊर्जा संवर्धनाला प्राधान्य देणारे.
- प्रत्येक ट्रेन ६ कोचची. एका ट्रेनची प्रवासी क्षमता २२८०.
- प्रत्येक कोचमध्ये ५२ प्रवाशांची बसण्याची आणि ३२८ प्रवाशांना उभे राहण्याची व्यवस्था.
.....................