जोगेश्वरीच्या मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम पार्कमध्ये साकारले मुंबईतील पहिले दिव्यांग-स्नेही मनोरंजन पार्क
By मनोहर कुंभेजकर | Updated: November 7, 2023 16:58 IST2023-11-07T16:58:24+5:302023-11-07T16:58:48+5:30
आता व्हीलचेअरवरून ये-जा करावी लागणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना देखील या पार्कचा आनंद घेता येईल.

जोगेश्वरीच्या मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम पार्कमध्ये साकारले मुंबईतील पहिले दिव्यांग-स्नेही मनोरंजन पार्क
मुंबई: जोगेश्वरीच्या मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम पार्कमध्ये मुंबईतील पहिले दिव्यांग-स्नेही मनोरंजन पार्क साकारले आहे. आता व्हीलचेअरवरून ये-जा करावी लागणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना देखील या पार्कचा आनंद घेता येईल.
महाराष्ट्र राज्याचे कौशल्ये, रोजगार, उद्यमशीलता आणि नावीन्य विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व पालिकेच्या सहयोगाने व लार्सन अँड टुब्रोच्या आर्थिक मदतीने विनानफा तत्त्वावर चालवल्या जाणाऱ्या प्रयास ट्रस्टच्या अध्यक्ष मीना सुब्रमण्यन यांनी या नवीन सुविधांचे आज उदघाटन केले.
बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या मालकीचे हे पार्क ५.५ हेक्टरपेक्षा जास्त जागेवर वसवण्यात आले असून २०१८ सालापासून ते सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले आहे..
सार्वजनिक-खाजगी भागीदारी द्वारे या संस्थेने 55,000 स्क्वेअर मीटरमध्ये हिरवेगार लँडस्केप, रेलिंग, रॅम्प, विशेष फ्लोअरिंगसह प्ले झोन आणि व्हीलचेअर वापरकर्त्यांसाठी स्विंगसह प्रवेशयोग्य पायाभूत सुविधांसह शिल्पग्रामचे पुनर्निर्माण केले आहे. दृष्टिहीन अभ्यागतांच्या सोयीसाठी, पालिकेने दिशानिर्देश आणि सूचना असलेले ब्रेल चिन्ह देखील निर्देशित केले आहे.तसेच या पार्कमध्ये लहान मुलांसाठीची खेळण्याची जागा सर्वसमावेशक सुविधा बनवण्यात देखील मदत केली आहे, त्यामुळे आता विशेष सक्षम मुलांसह सर्व मुले याठिकाणी खेळू शकतील. विशेष गरजा लक्षात घेऊन येथे उपकरणे उभारली आहेत तसेच जवळपास ४००० चौरस फीटचे रबर मॅटिंग करून पृष्ठभागाचे रीकारपेंटिंग केले आहे. यामुळे कुशनिंग व शॉक ऍबसॉरप्शनचे लाभ मिळतील तसेच एखादे मूल पडले तरी त्याला जखमा होणार नाही. त्यामुळे ही जागा मुलांसाठी, खास करून दिव्यांग मुलांसाठी खेळण्यासाठी अधिक जास्त सुरक्षित बनली आहे.
सहाय्यक महापालिका आयुक्त मनीष वळंजू यांनी सांगितले की,या उद्यानात आता ज्यांना दिव्यांगांसाठी लँडस्केप अधिक समावेशक बनवण्यासाठी आम्ही सदर उद्यान दिव्यांग-स्नेही केले आहे. या उद्यानात कारागीर, लोकनर्तक आणि संगीतकारांचे अनेक आकारांचे शिल्प सादर केले आहे, तर शारीरिकदृष्ट्या विकलांगांसाठी खास खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे.शिशिर जोशी या प्रकल्पाची रचना आणि संकल्पना तयार करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.