मुंबईकरांचा ‘ताप’ वाढतोय
By Admin | Updated: October 24, 2014 05:43 IST2014-10-24T05:43:27+5:302014-10-24T05:43:27+5:30
आॅक्टोबर हीटच्या तडाख्यामुळे मुंबईकर ऐन दिवाळीच्या तोंडावरदेखील तापामुळे फणफणले आहेत. आॅक्टोबर महिन्याच्या दुस-या आठवड्यामध्ये तापाचे एकूण २ हजार ६७२ रुग्ण आढळले

मुंबईकरांचा ‘ताप’ वाढतोय
मुंबई : आॅक्टोबर हीटच्या तडाख्यामुळे मुंबईकर ऐन दिवाळीच्या तोंडावरदेखील तापामुळे फणफणले आहेत. आॅक्टोबर महिन्याच्या दुस-या आठवड्यामध्ये तापाचे एकूण २ हजार ६७२ रुग्ण आढळले होते. मात्र तिसऱ्या आठवड्यामध्ये तापाच्या रुग्णांची आकडेवारी २ हजार ८३३ वर पोहोचली आहे. तिसऱ्या आठवड्यात डेंग्यूचे ४८ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पावसाळ्यामध्ये डेंग्यू, मलेरिया आणि तापाच्या रुग्णांंमध्ये वाढ होते. या आजारांवर आळा घालण्यासाठी महापालिकेने उपाययोजना आखल्या होत्या. मात्र यंदाच्या पावसाळ्यात आटोक्यात असलेल्या आजारांनी आॅक्टोबर महिन्यापासून डोके वर काढले आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तापाचे १ हजार ८९५ रुग्ण तर डेंग्यूचे ३३ रुग्ण आढळून आले होते. तर आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामुळे तापाचे २ हजार ३९१ तर डेंग्यूचे ४१ रुग्ण आढळून आले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत आॅक्टोबर महिन्यात रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याचे दिसून आले आहे.
सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर झालेला दिसत आहे. आॅगस्टमध्ये तापाचे ७ हजार ३०५ रुग्ण आढळून आले होते. सप्टेंबरमध्ये तापाच्या रुग्णांची संख्या ९ हजार ७८६ वर गेली असून आॅक्टोबरच्या तीन आठवड्यांमध्ये ७ हजार ८९६ रुग्ण आढळून आले आहेत. आॅगस्ट महिन्यात डेंग्यूचे ६५, सप्टेंबर महिन्यात १६७ तर आॅक्टोबर महिन्यात आतापर्यंत १३४ रुग्ण आढळले आहेत.
सप्टेंबर महिन्यात मलेरियाचे १ हजार ३५७ रुग्ण आढळून आले होते. आॅक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये मलेरियाचे २२८ रुग्ण आढळले असून तीन आठवड्यांत ७६९ रुग्ण आढळून आले आहेत. आॅक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या कमी झालेली दिसत आहे. आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात गॅस्ट्रोचे १५९, दुसऱ्या आठवड्यात १८९ आणि तिसऱ्या आठवड्यात १५७ रुग्ण आढळून आले आहेत. स्वाईन फ्लू आणि कॉलराचा एकही रुग्ण आतापर्यंत आॅक्टोबर महिन्यात आढळून आलेला नाही. टायफॉइडचे आॅक्टोबर महिन्यात १२७, हेपिटायटिसचे १२१ रुग्ण आढळून आले आहेत. (प्रतिनिधी)