लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नागरिकांच्या तक्रारी आणि असमाधानकारक सेवेमुळे ‘क्लीन अप मार्शल्स्’ सेवा ४ एप्रिलपासून खंडित केली जाणार असल्याचे मुंबई महापालिकेने जाहीर केले आहे. ४ एप्रिलनंतर मार्शलनी दंड घेतल्यास वॉर्ड ऑफिसकडे तक्रार करा, असे आवाहन पालिकेने मुंबईकरांना केले आहे.
ही योजना बंद करताना ‘स्वच्छ मुंबई अभियान’अंतर्गत नवीन कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. ‘क्लीनअप मार्शल’च्या संस्थांच्या प्रतिनिधींबाबत येणाऱ्या तक्रारींची दखल घेत त्यांची सेवा खंडित करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत संबंधित संस्थांना दंड आकारणीही करण्यात आली आहे. क्लीनअप मार्शलच्या संस्थांचे काम थांबविण्यात येत असले तरी ‘स्वच्छ मुंबई अभियाना’ची अंमलबजावणीचे सुरू राहणार आहे. त्यासाठी लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याचे उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी सांगितले.
पालिकेचा ठपका
- नागरिकांना स्वच्छतेसंबंधी नियमांचे पालन करण्यास सांगणे मार्शलकडून अपेक्षित होते. मात्र संबंधित मार्शल्सनी नियमांचा भंग केल्याचे दिसून आले.
- पालिकेच्या प्रशासकीय विभागांनी कळविलेल्या ठिकाणी न जाणे, बांधकामांच्या ठिकाणी कारवाई करणे अपेक्षित नसतानाही तेथे जाणे, बायोमेट्रीक हजेरीबाबत उदासीनता, नियमभंग करणाऱ्या नागरिकांकडून दंडाच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम आकारणे, आपल्या कक्षेबाहेरील परिसरात जाऊन पाहणी करणे, हॉटेल्स, बँक्वेट हॉल तसेच होर्डिंग आणि फलक आदी बाबी करारात नसतानाही तेथून दंड आकारणे यासह करारपत्रानुसार अटी व शर्थींचे पालन न करणे आदी बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आल्या आहेत.