Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘विसरभोळे मुंबईकरां’त महिन्याभरात वाढ ! बॅग हरवल्याच्या सर्वाधिक तक्रारी-जीआरपीची माहिती

By महेश चेमटे | Updated: November 12, 2017 21:38 IST

गेल्या महिनाभरात ९ आॅक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत रेल्वे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडे बॅगेसंदर्भातील तब्बल २ हजार १४९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक तक्रारी बॅग विसरल्याच्या असल्याचे रेल्वे पोलिसांतर्फे सांगण्यात आले.

ठळक मुद्देरेल्वे नियंत्रण कक्षातील -सर्वाधिक तक्रारी बॅग हरवणे महिला सुरक्षितता मेल-एक्सप्रेसमधील रिझर्वेशनचे प्रश्न

 मुंबईतील आयुष्य हे धावपळीचे असल्याने मुंबईकर कोणत्या ना कोणत्या चिंतेत असतात. या धकाधकीचा शारीरिक, मानसिक आरोग्यावरही अनेकदा परिणाम होतो. त्यात आता ‘विसरभोळ्या मुंबईकरां’च्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. गेल्या महिनाभरात रेल्वे पोलिसांच्या अत्याधुनिक नियंत्रण कक्षाकडे बॅगेसंदर्भातील तब्बल २ हजार १४९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक तक्रारी बॅग विसरल्याच्या असल्याचे रेल्वे पोलिसांतर्फे सांगण्यात आले.मुंबईतील उपनगरीय मार्गावरील प्रवाशांची संख्या तब्बल ७५ लाखांच्या घरात आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना सुरक्षिततेसाठी १५१२ या टोल फ्री क्रमांकाची सेवा सुरु करण्यात आली. नव्यानेच सुरु झालेल्या टोल फ्री क्रमांकाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ९ आॅक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत रेल्वे पोलिसांच्या या नियंत्रण कक्षात एकूण २१४९ फोन कॉल्स आले. पैकी सर्वाधिक तक्रारी बॅग विसरली, बॅग गहाळ झाल्याच्या असल्याचे रेल्वे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यात बॅग हरवल्याच्या तक्रारींचे फोन कॉल्सचे सर्वाधिक म्हणजे सुमारे ६०-७० टक्के असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.दुस-या क्रमांकावर महिला सुरक्षिततेसंदर्भातील कॉल्स रेल्वे पोलिसांना प्राप्त झालेत. त्याचे प्रमाण ४०-५० टक्के आहे. यात प्रथम दर्जाच्या महिला बोगीत पुरुषांनी प्रवास करणे, महिला द्वितीय दर्जाच्या बोगीत मारहाण आणि अन्य महिलांच्या सुरक्षेशी संबंधित तक्रारी आहेत. रुळादरम्यान झालेल्या अपघाताची माहिती देणारे फोनकॉल्सचे प्रमाण २०-३० टक्के आहे. मेल-एक्सप्रेसमधील ‘रिझर्वेशन’ वादाचे फोन कॉल्सचे प्रमाण १०-२० टक्के आहे. हे फोन कॉल्स ट्रेस करण्यासाठी मुंबई रेल्वे पोलिसांनी जीपीएस यंत्रणा बेस ‘आर-ट्रॅक’ हे अ‍ॅप विकसित केले आहे. प्रवाशांच्या अडचणी ‘रिअल टाईम’मध्ये सोडवण्यासाठी सर्व रेल्वे पोलिसांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप कार्यान्वित करण्यात आले आहे. तक्रारींच्या फोन कॉल्सचे निवारण करण्यासाठी संबंधित स्थानकातील ड्यूटीवरील रेल्वे पोलिसाला याची माहिती देऊन तत्काळ निवारणाचा प्रयत्न होतो. यासाठी आयुक्तालयात ९ मोठ्या एलईडी स्क्रीन बसवण्यात आले आहेत. वरिष्ठ अधिकाºयांच्या देखरेखीखाली आधुनिक तंत्रज्ञानाने प्रशिक्षित १५ अधिकाºयांची विशेष टीम नेमण्यात आली आहे. पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्या हस्ते आधुनिक नियंत्रण कक्षाचे उद्घाटन झाले होते.

    भान राखून प्रवास करावेजीपीएस बेस आर-ट्रॅक या अ‍ॅपमुळे प्रवाशांच्या प्रश्नांची सोडवणूक ‘रिअल टाईम’मध्ये करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मूळात स्थानकांवर लोकलचा थांबा काही सेंकद असतो. परिणामी पुढील स्थानकांवरील ड्यूटीवरील संबंधितांना त्याची माहिती देण्यात येते. प्रवाशांनीही आपल्या सामानाची काळजी घेणे गरजेचे आहे. लोकलमध्ये लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे हरवलेली प्रत्येक वस्तू परत मिळेल याबाबत शंका असते. प्रवाशांनी प्रवास करताना याचे भान राखावे.- निकेत कौशिक, आयुक्त, मुंबई लोहमार्ग पोलिस 

    टॅग्स :पोलिस