Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकर पाहणार ‘गिरण्यांचा इतिहास’; कसे व कुठे होणार हे वस्तुसंग्रहालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 09:49 IST

‘फाउंटन शो’च्या तलावांच्या स्वच्छतेसाठी पालिकेच्या निविदा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईला संपन्न करणाऱ्या गिरण्यांच्या इतिहासाचा प्रत्ययकारी प्रकल्प मुंबई महापालिका लवकरच साकारण्याचा तयारीत आहे. सुमारे ३०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या आर्थिक वर्षात आहे. यातून नव्या पिढीला गिरण्यांचा इतिहास पाहता येणार आहे. गिरणी उद्योगाला गतकालात लागलेली ‘कारुण्याची झालर’ मात्र यातून जाणवणार की नाही, ते मात्र इतिहास पाहिल्यावर कळेल. ‘कापड गिरणी वस्तुसंग्रहालय’ निर्माण करण्याचा हा महापालिकेचा प्रकल्प आहे. यात लाइट अँड साउंडचा वापर केला जाणार असून फाउंटन शोमधून हा गिरण्यांचा इतिहास आणि मुंबईतील अन्य पर्यटनाचे दर्शन यात केले जाईल. पहिल्या टप्प्यामध्ये फाउंटन शो हा मुख्य आकर्षण असून त्यासाठी संबंधित तलाव स्वच्छ केले जातील.

एकीकडे या फाउंटन शोच्या लाइट आणि आवाजासाठीचे आवश्यक भाग चीनमधून मागविण्यात आले आहेत, तर दुसरीकडे तलावांच्या स्वच्छतेसाठी निविदा पालिकेकडून मागविण्यात आल्या आहेत. हा फाउंटन शो ऑक्टोबरनंतर मुंबईकरांसाठी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबईचे तत्कालीन वैभव असलेल्या गिरणगावचा सुवर्णकाळ, गिरणी कामगारांचा इतिहास, गिरणगावची संस्कृती, गिरण्यांचे भोंगे, त्यांच्या लूमचा आवाज, लोकांची दैनंदिन लगबग, त्यांचे सामाजिक याेगदान आणि सांस्कृतिकता अशा विविध पैलूंचे दर्शन देणारा प्रकल्पच टेक्सटाइल म्युझियमद्वारे  महापालिका उभारणार आहे. 

कसे व कुठे होणार हे वस्तुसंग्रहालय भायखळ्यात दि इंडिया युनायटेड मिल क्रमांक २ व ३ च्या जागेवर रिक्रिएशन ग्राऊंड- कम टेक्साइल म्युझियम दहा एकर जागेवर उभे राहणार.  मिलची जागा राष्ट्रीय वस्त्राेद्याेग महामंडळामार्फत महापालिकेला हस्तांतरित.  मिलमधील संरक्षित तळे व त्या परिसराचे सुशोभीकरण, प्रकाश व ध्वनी माध्यमातून गिरणीचा इतिहास व गिरणी कामगारांचे सामाजिक योगदान व सांस्कृतिक पैलू यांचे सादरीकरण.   विद्यमान वास्तूमध्ये टेक्साइल म्युझियम, वाचनालय, सभागृह, कलाप्रदर्शन, पब्लिक प्लाझा आदी बाबींकरिता अंतर्गत बदल करून या पुरातन वास्तूंचे संवर्धन आणि पुनर्वापर.

टॅग्स :मुंबईवस्त्रोद्योग