मुंबई - राज्यात विजेचा पुरवठा करणारे महावितरण आता भांडूप व मुलुंड या दोन भागांसह मुंबईतवीज देण्याच्या तयारीत आहे. मुंबईत वीजपुरवठा करण्यासाठीच्या परवान्याकरिता महावितरणने वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. यावर होणाऱ्या सुनावणी, हरकतीनंतर आयोगाकडून निर्णय येणार असला तरी तूर्तास यानिमित्ताने मुंबईकरांना विजेसाठी आता बेस्ट, अदानी व टाटासोबत महावितरणचा पर्याय उपलब्ध होणार असल्याची शक्यता आहे.
कुलाबा ते माहीम, पश्चिम उपनगरात वांद्रे ते दहिसर, पूर्व उपनगरात विक्रोळी ते चुनाभट्टी आणि मानखुर्द तसेच चेना व काजुपाडासह मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात वीज वितरणासाठी परवाना मिळावा, अशी मागणी महावितरणने आयोगाकडे केली आहे. बेस्ट, अदानी व टाटा पॉवर यांना समांतर परवाना देऊन महावितरणला मुंबईतही वीजपुरवठा करण्यास परवानगी मिळावी, अशी ही याचिका म्हणते. कोस्टल मार्ग आणि मेट्रो जाळ्यासह मुंबईत पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. या सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात वीजपुरवठ्याची गरज भासणार आहे.
मुंबई शहरात बेस्ट तर पूर्व व पश्चिम उपनगरात टाटा पावर व अदानी इलेक्ट्रिसिटीकडून वीज दिली जाते. यापैकी बेस्टची वीज टाटा व अदानीच्या तुलनेत स्वस्त आहे. वांद्रे येथे असलेल्या महावितरणच्या मुख्यालयालाही अदानीकडून वीजपुरवठा केला जातो. तत्पूर्वी कोरोनादरम्यान, अदानीने मुंबई महानगर क्षेत्रात, राज्यात काही ठिकाणी टाटा आणि टोरोंटोने विजेचा पुरवठा करता यावा म्हणून आयोगाकडे याचिका दाखल केली होती. या सगळ्या याचिका निकाली निघण्याच्या प्रतीक्षेत असतानाच आता दुसरीकडे महावितरणही या वीज कंपन्यांच्या हद्दीत घुसण्याच्या तयारीत आहे.
वीज दर कपातीचा प्रस्तावसध्याची ४२ हजार मेगावॉटची विजेची क्षमता पाच वर्षांत ८१ हजार मेगावॉटवर नेण्यासाठी महावितरणने करार केले. यामध्ये हरित ऊर्जेवर भर दिला असून, यातून स्वस्त वीज मिळणार आहे. त्यामुळे महावितरणचा वीज दर कपातीचा प्रस्ताव आहे.