Join us

मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 06:21 IST

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईतील उड्डाणपुलांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या पुलांवरील खड्ड्यांसाठी महायुती सरकारमध्येच खो-खो सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.उड्डाणपुलाच्या देखभाल-दुरुस्ती, निधीचा विचार न करता, मतांसाठी केलेल्या टोलमाफी निर्णयावर अंमल करण्यात सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका सावंत यांनी केली.

३ जूनच्या मंत्रिमंडळ बैठकीत एसएसआरडीसीला नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला; पण जड वाहनांकडून २०२९ पर्यंत टोलवसुली सुरू ठेवण्याची परवानगी आयआरबीला देण्यात आली,’ असे सावंत म्हणाले. 

खर्च पालिकेच्याच माथी

टोलवसुलीच्या बदल्यात संबंधित कंपनीने उड्डाणपुलांची देखभाल करणे अपेक्षित होते. परंतु कंपनीकडून वारंवार टाळाटाळ होत असल्याने मुंबईकरांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. आता सरकारने मुदतीआधीच १९ उड्डाणपूल आणि काही रस्त्यांचे वर्गीकरण  मुंबई महापालिकेकडे करण्याचा निर्णय घेतला. मात्र, टोलवसुलीचा निधी रस्ते विकास महामंडळाकडेच जाणार असून, देखभालीसाठी महापालिकेला खर्च करावा लागणार आहे. त्यानंतर एमएसआरडीसीकडून खर्चाची भरपाई मागावी लागेल, असे ठरवण्यात आल्याचे ते म्हणाले.

‘सरकारकडे कोणतेही ठोस नियोजन नाही. कधी टोलवसुलीचा कालावधी वाढवणे, तर कधी तो कमी करण्याचे निर्णय घेण्यात येत आहे. हा मनमानी कारभार असून, त्याचे परिणाम थेट मुंबईकरांना भोगावे लागत आहेत,’ अशी टीका सावंत यांनी केली.

टॅग्स :सचिन सावंतटोलनाका