Join us  

मुंबईकरांची सुरक्षा ऐरणीवर! महिन्याभरात अग्नितांडवात 26 निष्पापांचा गेला बळी 

By namdeo.kumbhar | Published: December 29, 2017 12:34 PM

वर्षाखेरीस मुंबईत आग लागण्याच्या छोट्या-मोठ्या घटना घडल्या. सुत्रांच्या माहितीनुसार मुंबई आणि उपनगरात 2017 मध्ये दर महिन्याला सुमारे 10 ते 15 आगीच्या घटनांची नोंद होते.

मुंबई - वर्षाखेरीस मुंबईत आग लागण्याच्या छोट्या-मोठ्या घटना घडल्या. सुत्रांच्या माहितीनुसार मुंबई आणि उपनगरात 2017 मध्ये दर महिन्याला सुमारे 10 ते 15 आगीच्या घटनांची नोंद होते. सातत्याने लागणार्‍या या आगींवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशमन दलासमोर मोठे आव्हान उभे आहे. साकीनाका खैरानी रोडवरील भानू फरसाण दुकानाला लागलेल्या भीषण आगीत 12 कामगार होरपळले. हादरवून सोडणा-या या घटनेनंतर आज लोअर परेल भागातल्या कमला मिल कंपाऊंडमधल्या हॉटेल मोजोला आग लागली आणि पाहता पाहता ही आग वा-यासारखी पसरली. आतापर्यंत आगीत गुदमरून 15 जण जिवानिशी गेले. या आगीचे अशा अनेक दुर्घटना मुंबई शहर आणि उपनगरांत घडल्या असून, यात 26 जणांचा नाहक बळी गेला आहे. 

  • 25 डिसेंबर -  वाळकेश्वरमधील लिजंड इमारतीच्या 17 व्या मजल्यावर 25 डिसेंबर रोजी दुपारी आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. वाळकेश्वरमध्ये बाणगंगा रोडवर तीन बत्ती भागात लिजंड ही 31 मजल्याची इमारत आहे.  

 

  • 22 डिसेंबर - महालक्ष्मी, सातरस्ता येथील शांतीनगर परिसरातील बांधकामाधीन असलेल्या इमारतीला आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजून ४७ मिनिटांनी घडली.  अगिनशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच दलाचे ४ वॉटर टँकर आणि ३ फायर इंजिन घटनास्थळी रवाना झाले. बांधकामाधीन इमारतीच्या शेडसदृष्य साहित्याला आग लागली होती.  आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

 

  • 21 डिसेंबर - वांद्रे रेल्वे स्थानकाला गुरुवारी 21 तारखेला अचानक आग लागली. याआध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीवर योग्यवेळी नियंत्रण मिळवले. पण रेल्वे सेवेवर याचा परिणाम झाला. त्यामुळं प्रवाशांना हकनाक त्रास सहन करावा लागला. 

 

  • 18 डिसेंबर - साकीनाका येथे पहाटे एका फरसाणच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत 12 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. साकीनाक्याच्या खैरानी रोडवरील मखारीया कम्पाऊंडमध्ये असलेल्या भानू फरसाण गाळा नंबर-१ या दुकानाला पहाटे भीषण आग लागली. यावेळी भानू फरसाण दुकानासह इतर दुकानातील कामगार झोपेत होते. अचानक लागलेल्या या आगीमुळे काही कळायच्या आत 12 कामगार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.  ही आग इतकी भीषण होती की, कामगारांना त्यांचा जीवही वाचविता आला नाही. चोहोबाजूंनी आगीचे लोळ उठल्याने कामगारांना बाहेर पडता आले नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी येईपर्यंत 12 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. 

 

  • 17 डिसेंबर - नवी मुंबईतील  जुईनगर येथील एमआयडीसीत असलेल्या मोडेको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या केमिकल कंपनीला भीषण आग लागली. यात कंपनीचे पाच कामगार जखमी झाले होते. 

 

  • 11 डिसेंबर - ठाण्यातील वर्तकनगरमधील भीम नगरमध्ये 15 झोपडपट्ट्यांना आग लागली होती. यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी 15 कुटुंबीय बेघर झाले. यामध्ये त्यांचं आर्थिक नुकसान झालय.

 

  • 11 डिसेंबर - महापे एमआयडीसीतील स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन इमारतीच्या तीन मजली बेसमेंटमध्ये 11 तारखेला सोमवारी सायंकाळी लागलेली आग तब्बल 50 तासांनतर विझवण्यात यश आलं.  आग इतकी प्रचंड होती की अग्निशमन दलाचे जवान बेसमेंटमध्ये प्रवेश करू शकत नव्हते. आग विझवण्यासाठी चार लाख लिटरहून अधिक पाण्याचा मारा  करण्यात आला. 

 

  • 6 डिसेंबर  - सुरक्षेचे कोणतेही उपाय न योजता आणि क्षमतेपेक्षा अधिक सामान भरून ठेवल्यामुळे कायम वादग्रस्त ठरलेल्या भिवंडीतील गोदामांना 6 डिसेंबर रोजी सकाळी लागलेल्या आगीत 16 गोदामे जळून खाक झाली. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. अग्निप्रतिबंधक साधने नसल्याने सुरुवातीला एका गोदामाला लागलेली आग पसरत गेली. त्यातील प्लॅस्टिक आणि इतर साहित्याचा विषारी धूर यामुळे वातावरण प्रदूषित झाले. सात तासांच्या अथक परिश्रमानंतर संध्याकाळी आग आटोक्यात आणण्यात यश आले. यात जीवितहानी झाली नाही.   
टॅग्स :आगकमला मिल अग्नितांडवकमलामिल्स