Join us  

दिवे बंद करून मुंबईकरांनी केला वाढीव वीज बिलांचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 6:29 PM

मुंबई शहर आणि उपनगरातील वीज ग्राहकांना जून महिन्यात आलेल्या वीज बिलाने घाम फोडला आहे.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील वीज ग्राहकांना जून महिन्यात आलेल्या वीज बिलाने घाम फोडला आहे. ५ हजार रुपयांपासून १८ हजार रुपयांपर्यंत ही वीज बिले आली असून, ही बिले वाढीव असल्याच्या तक्रारी करत वीज ग्राहकांनी वीज कंपन्यांवर टिका केली आहे. हे होत असतानाच गुरुवारी रात्री ८ ते ८.३० या वेळेत मुंबईक र वीज ग्राहकांनी आपआपल्या घरातील दिवे बंद करत अदानी, टाटा, बेस्ट आणि महावितरणच्या या  कारभाराचा निषेध केला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात कोरोनाला हरविण्यासाठी तीन महिने लॉकडाऊन लागू करण्यात आले. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात हे लॉकडाऊन लागू असतानाच वीज कंपन्यांनी या काळात मीटर रिडिंग घेतले नाही. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रूवारी या महिन्यांच्या वीज बिलांवर सरासरी काढत मार्च, एप्रिल व मे महिन्याची वीज बिले धाडली. हिवाळ्यातील वीज बिलांवर ही सरासरी काढण्यात आल्याने साहजिकच ती कमी होती. नंतर मात्र मार्च, एप्रिल आणि मे या ऊन्हाळी महिन्यात विजेचा वापर वाढला. आणि या काळातील वीज बिले सरासरी असल्याने वाढीव वीज वापराची यात नोंद झाली नाही. आता जून महिन्यात झालेल्या रिडिंगनंतर वाढीव वीज वापराची यात नोंद झाली. परिणामी वीज कंपन्यांनी काढलेल्या सरासरी बिलानंतरचा फरक , जून महिन्याचे वीज बील आणि सोबत थकबाकी असे एकदम धाडले. परिणामी वीज ग्राहकांना शॉकच बसला. शिवाय मार्च महिन्यात लागू झालेल्या वीज दरवाढीचीदेखील यात भर पडली; आणि वीज ग्राहकांचे कंबरडे मोडले.

परिणामी वाढीव वीज बिलासह वीज दरवाढीचा निषेध करण्यासाठी वॉचडॉग फाऊंडेशनच्या वतीने गुरुवारी रात्री आठ ते साडे आठदरम्यान वीज बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते, अशी माहिती फाऊंडेशनचे गॉडफ्रे पिमेंटा यांनी दिली. यास प्रतिसादही उत्तम मिळाला. वरळी, माहीम, वांद्रे, खार, वडाळा, सांताक्रूझ, कलिना, वाकोला, सहार, मरोळ, कुर्ला, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, जुहू, गोराई आणि पवई येथील नागरिकांनी या निषेध आंदोलनात सहभाग घेतला होता, असे पिमेंटा यांनी सांगितले. वाढीव वीज बिलांची समस्या सोडविण्यासाठी वीज कंपन्यांनी ठोस पाऊले उचलावीत. आणि वीज ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी देखील फाऊंडेशनने केली आहे. 

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्यालॉकडाऊन अनलॉक