Mumbaikars invite Corona to return with family | मुुंबईकर देताहेत कोरोनाला सहपरिवार परत येण्याचे निमंत्रण

मुुंबईकर देताहेत कोरोनाला सहपरिवार परत येण्याचे निमंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लोकलमध्ये पाय ठेवायला जागा नाही. फलाट तर खचून भरले आहेत. तिकीट घ्यायला खिडक्यांवर ही गर्दी. बेस्टचीदेखील अशीच अवस्था; जणू काही माणसे कोंबून भरली आहेत. बरं, यांना जायचे कुठं? तर हाजीअली, जुहू बीच, मरिन ड्राइव्ह, गेट वे, सीएसएमटी नव्हे; तर व्हीटी, वांद्रे नव्हे, बँड्रा, दादर. आणि कशासाठी ? तर मजा करण्यासाठी...


अरे कोरोना, बिरोना काही आहे का नाही. तिकडे सरकार घसा फोडून बोंबलत आहे की, घरात बसा. सामाजिक अंतर पाळा. काम असेल तरच घराबाहेर पडा. पण तरीही ऐन शनिवारी, रविवारी पर्यटनस्थळी दाखल झालेल्या या नागरिकांमुळे कोरोनाच्या सुपर स्प्रेडचा धोका पुन्हा एकदा वाढला असून, आता विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या, कोरोनाला आमंत्रण देणाऱ्या, सामाजिक अंतर धुळीस मिळविणाऱ्या आणि मास्क खुंटीला टांगून ठेवणाऱ्या अशा नागरिकांना चांगलाच धडा शिकविण्याची गरज आहे, असा सूर उमटत आहे.


कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने सर्व स्तरावर प्रयत्न सुरु केले आहेत. याचा एक भाग म्हणून मुंबईत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर उपाय योजले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी वावरताना सामाजिक अंतर पाळणे, मास्क परिधान करणे आणि हात धुणे असे अनेक उपाय करण्यास सांगितले जात आहेत.  बहुतांश ठिकाणी याचा फज्जा उडाला आहे. सार्वजनिक ठिकाणी म्हणजे लोकल किंवा गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळले जात नाही.
बेस्टमध्येदेखील हीच अवस्था आहे. याव्यतिरिक्त घाटकोपर, कुर्ला, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली अशा मोठ्या रेल्वे स्थानक आणि बाजार परिसरातदेखील सामाजिक अंतर धुळीस मिळाले असून, मास्क परिधान करत नसलेल्यांची संख्यादेखील वाढत आहे. 


परिणामी अशा नागरिकांमुळे कोरोनाचा धोका वाढत असून, समुद्र किनारी अथवा उद्याने किंवा तत्सम परिसरातदेखील घोळक्याने, गर्दीने वावरणाऱ्यांच्या संख्येत भर पडत आहे. येथे कारवाई करण्याची गरज असल्याचे म्हणणे जागरूक नागरिकांकडून मांडले जात आहे.


दादर आणि कुर्ला मार्केट
दादर आणि कुर्ला रेल्वेस्थानकाच्या पूर्व आणि पश्चिमेला उसळणाऱ्या गर्दीने तर कहर केला आहे.  शनिवारसह रविवारी कुर्ला रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेला आणि दादर रेल्वेस्थानकाच्या पूर्व व पश्चिमेला मोठी गर्दी होत असून, नागरिक मास्क नीट वापरत नसल्याचे चित्र आहे. विशेषत: कुर्ला पश्चिम येथे तर खूपच वाईट अवस्था असून, येथे मास्क वापरण्याबाबत हलगर्जीपण बाळगण्यात येत आहे.
वर्सोवा बीच
वर्सोवा बीचवर कोरोनाचे नियम पाळत  नागरिकांनी सकाळी व संध्याकाळी मित्रमंडळी व कुटुंबासह फेरफटका मारत समुद्राचा आनंद लुटला. रविवारच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी येथील सात बंगला बीच, पिकनिक कॉटेज, मच्छलीमार या ठिकाणी संध्याकाळी गर्दी केली होती, तर एकांताचा आस्वाद घेण्यासाठी मावळत्या सूर्याला निरोप देत पिकनिक कॉटेज, मच्छलीमार या ठिकाणी खडकात बसून प्रेमाचा आनंद लुटत होते. तर मास्क लावत व फिजकिशन डिस्टन्सिंग पाळत नागरिक बीच वॉक करत होते. वेसावे  फेरीबोटीत कोरोनाचे नियम पाळले जात होते. 
हाजीअली
हाजीअली येथे फिरण्यास येत असलेले नागरिक मास्क घालण्याबाबत हलगर्जीपणा करत आहेत. विशेषत: येथील टॅक्सीचालकदेखील कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mumbaikars invite Corona to return with family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.