‘गुगल’च्या गुगलीमुळे मुंबईकर हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:06 AM2021-07-31T04:06:16+5:302021-07-31T04:06:16+5:30

सुविधेचा गैरफायदा घेत ऑनलाइनच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढले लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कुठल्याही माहितीच्या शोधासाठी आपसूकच गुगलच्या सर्च ...

Mumbaikars harassed by Google's Google | ‘गुगल’च्या गुगलीमुळे मुंबईकर हैराण

‘गुगल’च्या गुगलीमुळे मुंबईकर हैराण

Next

सुविधेचा गैरफायदा घेत ऑनलाइनच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कुठल्याही माहितीच्या शोधासाठी आपसूकच गुगलच्या सर्च इंजिनवर आपण पोहोचतो. मात्र, याच सर्च इंजिनमुळे अनेकांचे खिसे रिकामे झाले आहेत. अचूक माहिती मिळावी, या उद्देशाने खासगी, शासकीय आस्थापनांचे उपलब्ध तपशील बदलण्याचे अधिकार ‘गुगल’ या सर्च इंजिनने वापरकर्त्यांना दिले. याचाच गैरफायदा ऑनलाइनच्या माध्यमातून फसवणूक करण्यासाठी ठग घेत आहेत. मुंबई, दिल्लीसह देशभरात असे प्रकार घडत आहेत.

गुगलच्या वापरकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. सर्व्हेनुसार, प्रतिसेकंद जगभरातून ४० हजारांहून अधिक जण गुगलच्या सर्च इंजिनवर विविध प्रश्न, माहितीसाठी शोध घेतात. जवळची बँक शाखा, मोबाइल किंवा वीजबिल भरणा केंद्र, विविध सेवा पुरवठादार कंपन्यांचे सर्व्हिस सेंटर, ग्राहक तक्रार केंद्र, हॉटेल या आणि अशा प्रत्येक शासकीय, खासगी आस्थापनांचा पत्ता, संपर्क क्रमांक, दिशा दर्शविणाऱ्या नकाशासाठी गुगलचा उपयोग होतो. हे तपशील अचूक असावे, यासाठी गुगलने सजेस्ट अ‍ॅण्ड एडिट हा पर्याय दिला. त्याद्वारे तपशील बदलता येतो.

ऑनलाइनच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या ठगांनी हा पर्याय वापरून बँकांसह शासकीय, खासगी आस्थापना, हॉस्पिटल, हॉटेलचा अधिकृत संपर्क क्रमांक बदलून स्वत:चा मोबाइल क्रमांक गुगलवर देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे समोरून बोलणारी व्यक्ती बँक, ग्राहक सेवा केंद्रातील अधिकारी असे भासवून वापरकर्त्यांशी संवाद साधला जातो. पुढे कार्ड ब्लॉक झाल्याची भीती घालून बँक खाते, डेबिट-क्रेडिटकार्डच्या तपशीलाची मागणी केली जाते. खातेदारांकडून माहिती मिळताच त्याआधारे ठग संबंधितांच्या खात्यातून परस्पर पैसे काढत आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात अशा घटना घडत आहेत. वृद्धांसह उच्चशिक्षित मंडळीही याची शिकार ठरत आहेत.

सायबर पोलिसांचे आवाहन

फसवणुकीचे असे प्रकार लक्षात येताच महाराष्ट्र पोलिसांनी गुगलला पत्र पाठवून खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे बँक खात्यासह डेबिट-क्रेडिटकार्डाचे तपशील कोणालाही देऊ नयेत. ऑनलाइन व्यवहारांसाठी ओटीपीची (वन टाइम पासवर्ड) विचारणा होते, त्याशिवाय व्यवहार पूर्ण होत नाहीत. त्यामुळे मोबाइलवर ओटीपी क्रमांक दर्शवणारा लघुसंदेश आल्यास त्यातील तपशील कोणालाही देऊ नये. गुगलद्वारे माहिती मिळवताना संबंधित आस्थापनेच्या अधिकृत संकेतस्थळाचा शोध घ्यावा. त्यावरून संपर्क क्रमांक किंवा अन्य तपशील घ्यावेत, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Web Title: Mumbaikars harassed by Google's Google

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.