सचिन लुंगसेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: आझाद मैदानात आलेल्या मराठा आंदोलकांना मुंबईतल्या बांधवांनी मदतीचा हात दिला. गावाकडून भाकरी, भाजीची रसद दाखल होत असतानाच मुंबईत स्थायिक बांधवांनी मराठा समाजाचा कार्यकर्ता उपाशी राहू नये म्हणून घराघरातून जेवणाची व्यवस्था केल्याचे चित्र शनिवारी होते. तसेच आझाद मैदानातल्या प्रत्येक नाक्यावर आंदोलकांना पाणी आणि बिस्किटाचे वाटपही केले जात होते.
राज्यभरातून मराठा आंदोलक शनिवारीही आझाद मैदानात दाखल झाले. शुक्रवारी सकाळी आलेल्या बहुतांशी आंदोलकांनी रात्र आझाद मैदानासह सीएसएमटीवर काढली. दरम्यानच्या काळात ट्रक, टेम्पोमधून सोबत आणलेल्या जेवणाने आंदोलकांना आधार दिला. शुक्रवारी बंद असलेल्या खाऊ गल्ल्या शनिवारी खुल्या झाल्याने आंदोलकांना किंचित आधार मिळाला. मराठा आंदोलक शनिवारीही आझाद मैदानात दाखल होत असतानाच परतीचा प्रवास करणाऱ्या आंदोलकांची संख्याही तेवढीच होती. पुणे, सोलापूर जिल्ह्यातून आलेल्या आंदोलकांनी शनिवारी सायंकाळी परतीची वाट पकडली.
फलाटावर जेवण आणि आरामसीएसएमटी स्टेशनच्या सर्वच फलाटांवरील जागा आंदोलकांनी व्यापली होती. इंडिकेटरखाली संपूर्ण परिसरात प्रवाशांच्या सोयीसाठी दोरखंड बांधण्यात आला होता. दोरखंड बांधण्यात आलेल्या मधल्या भागात आंदोलक विश्रांती घेत होते; तर काही ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू होती.
लेझीमचा नाद कायमसीएसएमटीवर फलाट क्रमांक १ आणि २ दोनसमोरील मोकळ्या जागेत दिवसभर लेझीमच्या तालावर आंदोलकांनी ठेका धरला होता. पाटील...पाटील...अशा घोषणा देत हा परिसर दणाणून सोडला होता.
दोन हजार भाकरीसेल्फी पॉइंटलगत आंदोलकांना भाकरी आणि भाजीचे वाटप केले जात होते. शनिवारी सकाळी दोन हजारांहून अधिक भाकरी आंदोलकांना देण्यात आल्याचे पंढरपूरहून आलेल्या विश्वनाथ नायगुडे यांनी सांगितले.