Join us  

Cyclone Tauktae: मुंबईकरांनो घराबाहेर पडू नका! तौत्के चक्रीवादळामुळे ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे; पालिकेचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 9:54 PM

तौत्के नावाच्या चक्रीवादळामुळे रविवारी सायंकाळपासून वाऱ्याचा वेग वाढून तो ताशी ६० किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो.

मुंबई -  तौत्के नावाच्या चक्रीवादळामुळे रविवारी सायंकाळपासून वाऱ्याचा वेग वाढून तो ताशी ६० किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो. तर काही ठिकाणी हा वेग ताशी ८० किलोमीटर पर्यंत जाऊ शकेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. तसेच चौपाट्या तसेच समुद्रकिनाऱ्या नजीकचा परिसर आदी ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये अशी सूचनाही केली आहे.

या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त ( पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे व मुंबई शहर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष व अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या  अध्यक्षतेखाली शनिवारी ऑनलाईन विशेष बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी पालिकेच्या स्तरावरील तयारी व सुसज्जता याचा आढावा घेण्यात आला. हवामान खात्याद्वारे देण्यात येणाऱ्या सूचना आणि पाण्याचा वेग लक्षात घेऊन वरळी - वांद्रे परिसराला जोडणा-या राजीव गांधी सागरी सेतूवरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे मुंबई पोलीसांद्वारे सांगण्यात आले.

धोकादायक होर्डिंग्ज तातडीने हटवावेत, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या तुकड्या आवश्यक त्या साधन सामुग्रीसह सुसज्ज असल्याची माहिती बैठकीदरम्यान देण्यात आली. रेल्वेच्या स्तरावर आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात आल्या असून उपनगरीय रेल्वे सेवा ही सदर दोन्ही दिवशी सुरू राहील, अशी माहिती रेल्वेद्वारे देण्यात आली. मुंबई मेट्रो, रस्ते विभाग, सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) एम.एम.आर.डी.ए. इत्यादींद्वारे ज्या ज्या ठिकाणी पायाभूत सोयी सुविधांविषयी कामे सुरू आहेत, अशा सर्व ठिकाणी तातडीने बॅरिकेड्स लावून घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

वीज पुरवठा कंपन्यांना सूचना....बेस्ट विद्युत पुरवठा विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ आणि अदानी इलेक्ट्रिसिटी या विद्युत वितरण करणाऱ्या कंपन्यांनी आपापल्या स्तरावर आवश्यक त्या मनुष्यबळ व सामग्रीसह सुसज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून कोणत्याही परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाल्यास तो लवकरात लवकर पूर्ववत करता येऊ शकेल.

 

टॅग्स :तौत्के चक्रीवादळचक्रीवादळमुंबई