Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकच्या फासात अडकला मुंबईकरांचा श्वास; संजय गांधी उद्यानातील प्लास्टिक विळख्याची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 13:47 IST

मानवी हस्तक्षेपामुळे प्लास्टिकचा विळखा पडल्याचे चित्र

घनश्याम सोनार, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईचा श्वास म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालाही मानवी हस्तक्षेपामुळे प्लास्टिकचा विळखा पडल्याचे चित्र आहे. त्याचे गंभीर परिणाम येथील जैवविविधतेवर पडत असून पशु-पक्ष्यांसह पर्यावरणीय साखळीतील जीवजंतूंवर गंभीर संकट ओढावले आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या फासात आता मुंबईचाही श्वास कोंडू लागला आहे, असे पर्यावरण अभ्यासकांचे म्हणणे आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नागरिकांचे, संस्थांचे विविध कार्यक्रमही आयोजित केले जातात. त्यासह वर्षभर येथे नागरिकांची रेलचेल असते. मात्र त्यांच्याकडून होणाऱ्या प्लास्टिक वापराला वनविभागाकडून कोणताही अटकाव केला जात नाही. त्यासाठी कोणतीही प्रतिबंधक यंत्रणा राबविली जात नाही. त्यातूनच आता येथील वन्यजीवसृष्टी असहाय्य झाली आहे. आपल्या आनंदासाठी निसर्ग खराब करतो आहे, याकडे सामान्य नागरिक लक्षच देत नाही, अशी खंत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

वाढत्या नागरीकरणामुळे विविध विकास प्रकल्प गरजेचे आहेत. त्यात पर्यावरण नियमांकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. या विकास संकल्पनेतून वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर होणाऱ्या विपरीत परिणामांचा कोणीही विचार करत नाही. पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणी आणि त्यात होणारे प्रचंड आवाज आणि भौगोलिक उलथापालथ त्या दुष्परिणामांत आणखी भर घालत आहेत, असे पर्यावरण अभ्यासक दयानंद स्टालिन यांनी सांगितले.

बिबट्याचे जीवन धोक्यात

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुमारे ४० प्रकारचे सस्तन प्राणी, जमिनीवर तसेच पाण्यात वावरणारे, विविध रंग, आकारांचे २५० प्रकारचे पक्षी, ३८ प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि ९ प्रकारचे उभयचर आहेत. या उद्यानात प्लास्टिकमुळे बिबट्याचे जीवन देखील धोक्यात आले आहे; असे जाणकारांचे म्हणणे आहे.

केवळ पर्यावरण दिन साजरा करून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आपण वाचवू शकत नाही.  तो मुंबईचा श्वास आहे.  मानवी हस्तक्षेपाचा जो अतिरेक झाला आहे. तो तत्काळ थांबायला हवा. वन्यजीव आणि जंगल जर नष्ट झाले तर आपल्याला श्वास घेणेही मुश्किल होईल.-रोहित जोशी, पर्यावरण अभ्यासक

टॅग्स :मुंबई