मुंबईकरांना एसटीच्या ई-बसची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:13 IST2021-09-02T04:13:38+5:302021-09-02T04:13:38+5:30
मुंबई : डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत आले आहे. इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यासाठी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. ...

मुंबईकरांना एसटीच्या ई-बसची प्रतीक्षाच
मुंबई : डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत आले आहे. इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यासाठी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. राज्यातील काही विभागात १५० पर्यावरणपूरक बसेस चालविण्यात येणार आहेत. मुंबई विभागात एकही ई-बस चालविण्यात येणार नाही. मुंबईकरांना एसटीच्या ई-बसची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केले. त्याचा आर्थिक फटका एसटी महामंडळाला बसला आहे. अद्यापही कोरोना संसर्ग सुरू आहे. भीतीपोटी एसटी बसेसला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. महामंडळाची आर्थिक परिस्थिती बिकट होऊ लागली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यास महामंडळाकडे पैसे नाही. कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. अशा परिस्थितीत डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढू लागले आहे. दरवाढीचा फटका महामंडळाला अधिकच बसला आहे. डिझेल भरण्यास पैसे नसल्यामुळे बसेसही उभ्या राहतात. गत काही वर्षांपासून इलेक्ट्रिक बॅटरीवर मोटारसायकल, रिक्षा आणि चारचाकी वाहने धावू लागली आहेत. महामंडळानेही इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचा विचार चालविला आहे.
---
राज्यात १५० गाड्यांचे नियोजन
राज्य परिवहन महामंडळाने इलेक्ट्रिकवर बसेस चालविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. एसटी महामंडळाच्या उपमहाव्यवस्थापकानी २००० गाड्यांचे नियोजन करण्याबाबतचे आदेश विभाग नियंत्रकांना दिले आहेत. यापूर्वी औरंगाबाद, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, नांदेडसाठी १५० गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
चार्जिंगची व्यवस्था
इलेक्ट्रिक बसची वाहन वापर क्षमता ४०० किमीची आहे. परंतु ३०० किमीच्या अंतरावर चार्जिंग व्यवस्था केली जाणार आहे. औरंगाबाद, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे ३०० किमी अंतर पार केल्यानंतर चार्जिंग करणे बंधनकारक असणार आहे.
---
खर्चात होणार बचत
विजेवर चालणाऱ्या एसटी बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर खर्चात बचत होणार आहे. अडचणी कमी होतील. कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होऊ शकतील. बसच्या चार्जिंगसाठी महत्त्वाच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत.
----
सध्या मुंबई विभागात विविध उपक्रम सुरू आहेत. मात्र कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. अधिकारी, कर्मचारी, सुपरवायझर पुरेसे नाहीत. त्यामुळे मुंबईत ई-बस सुरू करण्यात आलेली नाही. राज्यात इतर ठिकाणी मिळालेला प्रतिसाद पाहून मुंबईतही लवकरच ई-बस सुरू करण्यात येतील.
वरिष्ठ अधिकारी, एसटी महामंडळ