Join us

धक्कादायक! मुंबईकर दररोज शोषत आहेत पाच सिगारेटएवढा धूर

By सचिन लुंगसे | Updated: November 11, 2024 06:54 IST

पाच सिगारेट ओढल्यानंतर जेवढा धूर फुफ्फुसांत जमा होतो तेवढाच धूर प्रदूषणामुळे शरीरात शोषला जात आहे.

सचिन लुंगसे, उप-मुख्य उपसंपादक |

मुंबई शहर आणि उपनगरातील बेकऱ्या, वाहने, कारखाने, भट्ट्या आणि बांधकामांमुळे होणाऱ्या प्रदूषणात दिवसागणिक भर पडत असून, या प्रदूषणामुळेमुंबईकरांच्या शरीरात श्वसनाद्वारे पाचहून अधिक सिगारेटच्या धुराएवढा घातक धूर जात आहे. म्हणजे पाच सिगारेट ओढल्यानंतर जेवढा धूर फुफ्फुसांत जमा होतो तेवढाच धूर प्रदूषणामुळे शरीरात शोषला जात आहे. मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटाच आहे.

एक सिगारेट म्हणजे पीएम २.५ चे २२ मायक्रॉन प्रतिघनमीटर प्रमाण होय. दिवसभरात २२ मायक्रॉन प्रतिघनमीटर प्रदूषित हवा श्वसनातून फुप्फुसात जाणे म्हणजे एक सिगारेट ओढण्यासारखे आहे. गेल्या शनिवारी मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक १८५ पीएम २.५ एवढा नोंदविण्यात आला होता. या हवेत श्वास घेणे म्हणजे दिवसभरात पाच किंवा त्याहून अधिक सिगारेट ओढण्यासारखे होते. याच दिवशी वांद्रे, खेरवाडी येथील निर्देशांक २३३ होता. येथील हवेत श्वास घेणे म्हणजे आठ सिगारेट ओढण्यासारखे होते. 

आवाज फाउंडेशनच्या सुमेरा अब्दुल अली यांनी या मुद्द्याकडे महापालिका आणि राज्य सरकारचे सातत्याने लक्ष वेधले आहे. यावर रस्त्यावर पाण्याचे फवारे मारण्यासह महापालिकने खूप काम केले. मात्र, वाढत्या प्रदूषणाच्या तुलनेत महापालिकेला मोठ्या स्तरावर उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून मुंबईच्या प्रदूषणात भर पडत असून, वाहनांच्या प्रदूषणात वाढत्या बांधकामांनी प्रदूषणाच्या आगीत तेल ओतले आहे. रस्त्यांसह गगनचुंबी इमारतींच्या बांधकामांमुळे हवेतल्या प्रदूषणात भर पडत असून, दिवाळीत फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे तर त्यात आणखीनच भर पडली आहे. मुंबईतला थंडीचा हंगाम आता तर प्रदूषणाचा ओळखला जाऊ लागला आहे. धूळ, धूर आणि धुके यांच्या मिश्रणाने तयार होणारे धुरके मुंबईकरांना तापदायक ठरत आहे. आवाज आणि वातावरण फाउंडेशनने ऑक्टोबर महिन्यात मुंबईमध्ये नोंदविलेले प्रदूषण जनजागृतीसाठी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. दिवाळीत हवेच्या गुणवत्तेचा दर्जा वाईट नोंदविण्यात आला होता; हे त्यांनी लक्षात आणून दिले होते. आजही हे काम जनजागृतीसाठी वेगाने सुरू आहे. उद्योग, वाहने यातून निघणारा धूर अधिक धोकादायक आहे. त्यामुळे यावर उपाययोजना आखल्या जाताना त्या पद्धतीने आखल्या जाव्यात. कारण हवेतील प्रदूषण म्हणजे केवळ धूळ नव्हे, याकडे अभ्यासकांनी लक्ष वेधले आहे. सल्फर, नायट्रोजन, कार्बन डाय ऑक्साइडसारखे विषारी वायू मुंबईकरांच्या शरीरात जात आहेत. पॉवर प्लांट, उद्योग, कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या सल्फरचे प्रमाण अधिक आहे. या सगळ्यातून होणाऱ्या प्रदूषणाची मोजदाद नीट होत नाही आणि केली तर लोकांना याची माहिती नीट दिली जात नाही. शिवाय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून यासंदर्भात कारवाई होत नाही हे दुर्दैव आहे. मुंबईत प्रत्येक वर्षीच्या हिवाळ्यात सर्वसाधारण हीच स्थिती असून, दिल्लीत तर यापेक्षाही वाईट स्थिती आहे. दिल्लीच्या हवेत श्वास घेणे म्हणजे दररोज ४० सिगारेट ओढण्यासारखे आहे, असे अभ्यासक सांगतात.मुंबईचे प्रदूषण म्हणजे पीएम २.५ आणि पीएम १० या दोन विभागवर्गवारीत मोजले जाते. त्याच्या सरासरीनुसार, हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक काढला जातो.

हिवाळा आरोग्यदायी असतो. अलीकडे शहरे प्रदूषित झाल्यामुळे हिवाळा प्रदूषणामुळे आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे. भौगोलिकदृष्ट्या संथ हवा आणि कमी तापमान हे जास्त प्रदूषणास कारणीभूत ठरतात. सूक्ष्म धूलिकण (२.५ आणि १०) नायट्रोजन डाय ऑक्साइड, सल्फर डाय ऑक्साइड, कार्बनडाय ऑक्साइड, कार्बन मोनोक्साइड, अमोनिया प्रत्येक प्रदूषकांची स्वतंत्र नोंद वेगळी असते. परंतु, हवेच्या गुणवत्तेचा दर्जा सर्व प्रदूषके मिळून सरासरी काढली जाते. प्रदूषणामुळे दमा, टीबी, कॅन्सर, सर्दी, खोकला, डोळे, त्वचा आणि हृदय रोगांचे रुग्ण वाढत आहेत.

टॅग्स :मुंबईप्रदूषण