Join us

तरुणांनी साकारलेल्या सचिनच्या रांगोळीची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 17:44 IST

या दोन तरुणांनी काढलेल्या महाकाय रांगोळीची दखल 'इंडीया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये' घेण्यात आली आहे.

ठळक मुद्देया दोघांकडे सचिन तेंडूलकरचे गेल्या 17 वर्षांपासूनची सर्व माहिती संग्रहीत आहेत.अभिषेक साटम हा सचिन तेंडूलकरचा जबरा फॅन आहे. सचिनचं भलंमोठं कलेक्शनचं या पठ्ठ्याकडे आढळतं. या रांगोळीची दखल खुद्द सचिन तेंडूलकरनेही घेतली आणि आपल्या अ‍ॅपवर या रांगोळीचा समावेशही केला.

मुंबई - सचिन तेंडूलकरच्या 44 व्या वाढदिवसासाठी साकारण्यात आलेल्या रांगोळीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आला आहे. अभिषेक साटम आणि संदीप बोबडे या दोन तरुणांनी सचिन तेंडूलकरची 44 फूट लांब आणि 24 फूट रुंदीची रांगोळी साकारली होती. या रांगोळीमुळे ‘बिगेस्ट रांगोळी ऑन मास्टर ब्लास्टर’ हे शीर्षक त्यांच्या नावावर झाले आहे. नुकत्याच दिल्लीत झालेल्या एका समारंभात त्यांना पदक आणि प्रशस्तीपुस्तक देऊन गौरवण्यात आले आहे. जगभरातल्या आठ देशांमधून आलेल्या दोन हजारांहून अधिक नावांमधून सर्वोत्कृष्ट 100 विक्रमांच्या यादीतही त्यांना मानाचे स्थान मिळाले आहे.

आणखी वाचा - आंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्र स्पर्धेत मुंबईच्या तरुणाची बाजी

सचिन तेंडूलकरचे मोठे चाहते असलेले अभिषेक साटम आणि संदीप बोबडे या दोन तरुणांनी 24 एप्रिल 2017 साली परळच्या आर.एम.भट शाळेत सचिनच्या 44 व्या वाढदिवसानिमित्त 44 फूट लांब आणि 24 फूट रुंदीची रांगोळी साकारली होती. ही रांगोळी साकारण्यासाठी या दोघांना तब्बल 18 तास लागले होते. सचिन तेंडुलकरचे भव्य पोट्रेट, त्याच्या कारकिर्दीतले महत्त्वाचे क्षण आणि त्याने केलेला शंभर शतकांचा विक्रम या साऱ्या गोष्टींचा या रांगोळीत समावेश करण्यात आला होता. ही रांगोळी पाहण्यासाठी अनेक मुंबईकरांनी इथे मोठी गर्दी केली होती.

आणखी वाचा - सचिन तेंडुलकरचं 'हेल्मेट डालो' अभियान, गाडी थांबवून दुचाकीस्वारांना दिला हेल्मेट घालण्याचा सल्ला

 या रांगोळीची दखल खुद्द सचिन तेंडूलकरनेही घेतली आणि आपल्या अ‍ॅपवर या रांगोळीचा समावेशही केला. त्यानंतर अभिषेकने या रांगोळीसाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी अर्ज केला होता. त्यापैकी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या रांगोळीची नोंद करण्यात आली. 

अभिषेक साटम हा सचिन तेंडूलकरचा जबरा फॅन आहे. त्याने गेल्या 17 वर्षांपासून सचिनविषयी आलेली प्रत्येक माहिती संग्रहीत करून ठेवली आहे. सचिनचं भलंमोठं कलेक्शनचं या पठ्ठ्याकडे आढळतं. यामध्ये सचिनचे 40 हजारांहून अधिक फोटो, सचिनशी संबंधित असलेले लेख, मासिकं, पुस्तके आणि सोन्याचा मुलामा आणि सचिनचा ऑटोग्राफ असलेली बॅट यांसारख्या गोष्टींचा खजिना त्याच्याकडे आहे.

टॅग्स :मुंबईसचिन तेंडूलकररांगोळीआंतरराष्ट्रीय