मुंबईकर पुन्हा बेफिकीर; विनामास्क फिरणारे वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:06 IST2021-07-17T04:06:37+5:302021-07-17T04:06:37+5:30
मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असताना मुंबईकर बेफिकीर राहू लागले आहेत. बहुतांशी नागरिक तोंडाला मास्क लावत असले तरी ...

मुंबईकर पुन्हा बेफिकीर; विनामास्क फिरणारे वाढले
मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असताना मुंबईकर बेफिकीर राहू लागले आहेत. बहुतांशी नागरिक तोंडाला मास्क लावत असले तरी काही मोजक्या लोकांमुळे संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या २४ तासांत पालिका व पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या ५,२९० नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तर आतापर्यंत ३० लाख नागरिकांकडून ६० कोटी ४८ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनाचा मुंबईत शिरकाव झाल्यानंतर मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास पालिकेने एप्रिल २०२०पासून सुरुवात केली. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आला असल्याने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. दिवसभरात अशा ५,२९० नागरिकांकडून १० लाख ५८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
एप्रिल २०२० ते १५ जुलै २०२१
नागरिक ... आतापर्यंत दंड
२५७६९०६ ...५१९०२३४०० (महापालिकेमार्फत कारवाई)
४०३८५९ ... ८०७७१८०० (मुंबई पोलिसांमार्फत कारवाई)
मालाड विभागात सर्वाधिक कारवाई
- एप्रिल २०२० ते १५ जुलै २०२१पर्यंत ३० लाख चार हजार ६५६ लोकांवर कारवाई करून ६० कोटी ४८ लाख ३४ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मालाड विभागात सर्वाधिक ३६९ विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून ७३ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
- दक्षिण मुंबईत कुलाबा ते भायखळा या परिसरातून सर्वाधिक १०७१ नागरिकांना विनामास्क पकडण्यात आले. त्यांच्याकडून दोन लाख १४ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला.