Join us
Daily Top 2Weekly Top 5

युवासेना, बुक्टुचा मुंबई विद्यापीठात रात्री उशीरापर्यंत ठिय्या; आवाज दडपण्याचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 23:14 IST

सिनेट बैठक संपल्यानंतरही सभागृहातून बाहेर पडण्यास नकार

मुंबई -  विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय बैठकीत आवाज दाबला जात असल्याचा आरोप करून युवासेना, बुक्टुच्या सदस्यांनी सिनेट बैठक सुरू असलेल्या सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात सुरू केलेले आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सिनेट बैठक संपल्यानंतरही त्यांनी सभागृहातून बाहेर पडण्यास नकार देत आंदोलन सुरू ठेवले. विद्यापीठ प्रशासन प्रश्नांची उत्तरे देत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा पवित्र त्यांनी घेतला. 

हे आंदोलन मागे घ्यावे यासाठी विद्यापीठ प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी सिनेट सदस्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तसेच युवासेनचे सदस्य आणि बुक्टुचे प्राध्यापक प्रवर्गातून निवडून आलेले सदस्य यांची मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी आणि प्र. कुलगुरू प्रा. अजय भामरे यांनी भेट घेतली.

मात्र अर्थसंकल्प विहित प्रक्रिया पार पाडून व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर करून घ्यावा आणि त्यानंतरच तो सिनेटमध्ये पुन्हा मांडावा यावर युवासेना आणि बुक्टुचे सदस्य ठाम होते. यावर कुलगुरू ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहातून उठणार नाही, अशी भूमिका सिनेट सदस्यांनी घेतली आहे. त्यामुळे हा तिढा रात्री उशिरापर्यंत कायम होता. त्यातून सुमारे १८ सिनेट सदस्य रात्री उशिरापर्यंत सभागृहात बसून होते.  दरम्यान आंदोलन स्थळावर सायंकाळच्या सुमारास पोलिस दाखल झाले होते. मात्र काही वेळ चर्चा करून ते माघारी गेले.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ