Join us  

मुंबईत छेडछाडीच्या भीतीने तरुणीने चालत्या ट्रेनमधील मारली उडी, गँगमनमुळे वाचला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 10:45 AM

छेडछाडीच्या भीतीने एका तरुणीने चालत्या ट्रेनमधून उडी मारल्याची घटना समोर आली आहे. पायल कांबळे असं या तरुणीचं नाव असून सीएसएमटी स्थानकावरुन करी रोडला जात असताना ही घटना घडली.

ठळक मुद्देछेडछाडीच्या भीतीने एका तरुणीने चालत्या ट्रेनमधून उडी मारल्याची घटना पायल कांबळे असं या तरुणीचं नाव असून सीएसएमटी स्थानकावरुन करी रोडला जात असताना ही घटना घडलीपायलच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे

मुंबई - छेडछाडीच्या भीतीने एका तरुणीने चालत्या ट्रेनमधून उडी मारल्याची घटना समोर आली आहे. पायल कांबळे असं या तरुणीचं नाव असून सीएसएमटी स्थानकावरुन करी रोडला जात असताना ही घटना घडली. रविवारी सकाळी 9.29 च्या लोकलने पायल कांबळे ट्युशनसाठी जात होती. यावेळी एक तरुण महिलांच्या डब्यात चढला. यावेळी छेडछीच्या भीतीने पायलने चालत्या ट्रेनमधून उडी मारली. यामध्ये तिच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, उपचार सुरु आहेत. 

'मला क्लासला जाण्यासाठी उशीर झाला होता, त्यामुळे मी मधील सेकंड क्लास लेडिज अपार्टमेंटमध्ये चढली. त्यावेळी डब्यात कोणतीही महिला प्रवासी नव्हती. ट्रेन सुरु झाल्यानंतर अचानक एक तरुण डब्यात घुसला. मी घाबरले आणि अलार्म चेन ओढली, पण ट्रेन थांबली नाही. त्या तरुणाने मला शांत राहायला सांगितलं. यानंतर मी अजून घाबरले, आणि पुन्हा चेन ओढण्यास सुरुवात केली. तो पुन्हा पुन्हा वॉर्निंग देऊ लागला आणि जवळ येण्याचा प्रयत्न करु लागला', अशी माहिती पायलने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली आहे. 

घाबरलेली पायल ट्रेनच्या दरवाजावर आली. ट्रेनचा वेग कमी असल्याने तिने चालत्या ट्रेनमधून उडी मारली. त्यावेळी काही गँगमॅन तिथे उपस्थित होते. त्यांनी तिला पडताना पाहिलं आणि धाव घेतली. तिला जखमी अवस्थेत प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर आणण्यात आलं. 

'माझ्या आईला फोन करुन माहिती देण्यात आली आणि मला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. माझ्या पायाला प्रचंड दुखापत झाली होती, त्यातून रक्त वाहत होतं. पायाकडे पाहण्याची माझी हिंमतही होत नव्हती', असं पायलने सांगितलं आहे. पायलवर उपचार करण्यात आले असून, सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. घटना घडली तेव्हा पायलचे वडिल शहराबाहेर होते. आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचं ते बोलले आहेत. 

जीआरपी अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपीचं रेखाचित्र रेखाटण्यात आलं आहे. 'आम्ही सीएसएमटी आणि मस्जिदचं सीसीटीव्ही तपासत असून, आरोपीची ओळख पटवण्यासाठी पायलला दाखवत आहोत. कदाचित फोन किंवा दागिन्यांच्या चोरीसाठी हा प्रयत्न झाला असावा. आम्ही पायलचा जबाब नोंदवला आहे', अशी माहिती अधिका-याने दिली आहे.  

टॅग्स :मुंबई लोकलमध्ये रेल्वेगुन्हा