Join us

Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 21:39 IST

Woman Assaults Andheri RTO Staff: मुंबईतील अंधेरी येथील आरटीओ कार्यालयात एका महिलेने कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली.

मुंबईतीलअंधेरी येथील आरटीओ कार्यालयात एका महिलेने गोंधळ घातला. यावेळी महिलेने आरटीओच्या एका महिला कर्मचाऱ्याला मारहाण केली आणि कार्यालयातील संगणकाचे नुकसान केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

ईशा छाब्रा असे आरोपी महिलेचे नाव आहे. अंधेरी आरटीओमधील वरिष्ठ लिपिक वृषाली काळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ईशा छाब्रा विरोधात अंबोली पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम १३२, १२२(२), ३२४(२) आणि ३५२ अंतर्गत आरोपी ईशा छाब्रा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, सोमवारी छाब्रा यांनी आरटीओला भेट दिल्यानंतर हा प्रकार घडला. 

छाब्रा यांनी त्यांची गाडी कोणालाही विकली गेली नसताना स्नेहा पांडे नावाच्या महिलेच्या नावावर कोणत्याही औपचारिक कराराशिवाय हस्तांतरित करण्यात आली, अशी तक्रार आरटीओत केली. तसेच त्यांची गाडी ताबडतोब त्यांच्या नावावर नोंदणीकृत करावी, अशी मागणी केली. त्यावेळी वृषाळी काळे यांनी छाब्रा यांना ताबडतोब पुनर्नोंदणी शक्य नसल्याचे सांगितले. मात्र, यामुळे छाब्रा खूप भडकल्या. तिथे उपस्थित असलेल्या ज्युनिअर क्लर्क भोगले यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पंरतु, त्यांनी कोणाचेही ऐकले नाही. 

पुढे छाब्रा यांनी कार्यलयात गोंधळ घातला आणि काचेच्या फाटक्यातून हात पुढे करत संगणक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेत संगणकाचे नुकसान झाले. त्यानंतर छाब्रा यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी वृषाली काळे यांनी आपल्या फोनमध्ये हा सर्व प्रकार रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. हे पाहताच छाब्रा यांनी वृषाली यांच्या हातातून फोन हिसकावला आणि कार्यालयातून बाहेर पडल्या. फोन घेण्यासाठी कर्मचारी त्याच्याकडे गेले असता छाब्राने त्यांच्या कानशि‍लात लगावली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले.

टॅग्स :मुंबईअंधेरीआरटीओ ऑफीस