Join us
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या पावसाळ्यात मुंबई तुंबणार नाही; नव्या आयुक्त अश्विनी भिडे यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 06:24 IST

पाण्याचा निचरा करणाऱ्या प्रकल्पांच्या कामांचा वेग वाढवला

मुंबई : मुंबई महापालिका माझ्यासाठी नवी नाही. कोविड काळात मी पालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे आज आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारताना मला 'होम कमिंग' अर्थात स्वगृही आल्यासारखे वाटते, अशी भावना मुंबई महापालिकेच्या नवनिर्वाचित आयुक्त अश्विनी भिडे यांनी मंगळवारी पदाचा कार्यभार स्वीकारताना व्यक्त केली. अतिवृष्टीत पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठी व पाण्याचा निचरा करण्याची क्षमता वाढवण्यासाठी पालिकेने गेल्या काही वर्षात विविध प्रकल्प राबवले आहेत. या कामांचा वेग आणखी वाढवला जाईल, त्यामुळे पावसाळ्यात मुंबई तुंबणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

भिडे यांनी मावळते आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड उपस्थित होते. मनोगतात भिडे यांनी सर्वप्रथम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले. मुंबई महापालिका आणि या शहराला एक वारसा आहे. हा वारसा अधिक समृद्ध करण्याचे काम आधीच्या सर्व आयुक्तांनी केले आहे. तीच परंपरा मी पुढे चालवेल, असे भिडे म्हणाल्या.

महिला म्हणून वेगळे असे काही नसते. आज अनेकांनी पहिल्या महिला आयुक्त म्हणून माझे अभिनंदन केले. अशी संधी पहिल्यांदा मिळाल्याने, कदाचित 'महिलाराज' असे आपण म्हणू शकतो, असे त्या मिश्कीलपणे म्हणाल्या.

याची सर्वांना कल्पना 

सर्वांना कल्पना आहे आणि होती; त्याप्रमाणे भिडे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली आहेत, असे मिश्कीलपणे सांगत गगराणी यांनी भिडे यांचे स्वागत केले. आयुक्त म्हणून काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी राज्य सरकारचा आभारी आहे. पालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी सक्षम आहेत, या सर्वांनी मला २ वर्षे सांभाळून घेतले. प्रशासकीय काळात माध्यमांनी दिलेल्या सहकार्यामुळे जनतेपर्यंत पोहोचता आले, असे मनोगत गगराणी यांनी व्यक्त केले.

खऱ्या अर्थाने पालिका वाटते... 

प्रशासन व लोकप्रतिनिधी नेहमीच एकत्र काम करत असतात. कोविड काळात सर्व ठप्प असतानाही बैठका होत होत्या. त्यानंतर मधला काळ प्रशासक म्हणून कामकाज सुरू होते. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातूनच चांगले काम होत असते. आता पुन्हा एकदा तसे होत असल्याने मुंबई महापालिका खन्याअर्थाने महापालिका वाटू लागली आहे, असे त्या म्हणाल्या.

गगराणी आदर्श

गगराणी हे कोल्हापूरचे; तर मी सांगलीची! गगराणी हे मराठी वाङ्‌मय हा विषय घेऊन संपूर्ण भारतातून प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत तिसरे आले होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच मी प्रशासकीय सेवेत आले, असे भिडे यांनी आवर्जून सांगितले.

३१ वर्षांचा गाढा अनुभव 

अश्विनी भिडे या सनदी सेवेतील १९९५च्या तुकडीतील अधिकारी आहेत. प्रशासकीय सेवेचा सुमारे ३१ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात अनेक महत्त्वाच्या पदांचा कार्यभार सांभाळला आहे. त्यांत प्रामुख्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त विभागीय आयुक्त, राज्य शासनात सहसचिव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त महानगर आयुक्त, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सचिव, मुख्यमंत्री कार्यालयाच्या अपर मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम केले आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी मुंबईत मेट्रो रेल्वेचे जाळे निर्माण करण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. भिडे यांनी महापालिकेत ९ मे २०२० ते १९ मार्च २०२४ या कालावधीत ३ अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) या पदावर कार्य केले आहे. मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प तडीस नेण्यातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. विविध ठिकाणी महत्त्वाच्या पदांवर असताना केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना विविध संस्था-संघटनांनी सन्मानित केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Won't Flood This Monsoon, Assures New Commissioner Ashwini Bhide

Web Summary : New Mumbai Municipal Commissioner Ashwini Bhide promises no flooding this monsoon. Past projects to improve drainage will be accelerated. She acknowledges her prior experience in the corporation and aims to continue the legacy of previous commissioners. Bhide also playfully addressed being the first female commissioner.
टॅग्स :अश्विनी भिडेमुंबई महानगरपालिका