Join us

QR Code वरुन तिकीट काढणे आता बंद, टीसी येताच विनातिकीटवाले धावत्या ट्रेनमध्येच करतात बुकिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 11:11 IST

पश्चिम रेल्वेच्या लोकल स्टेशनवर स्टॅटिक क्लूआर कोडद्वारे पेपरलेस मोबाइल तिकीट बुकिंग बंद करण्यात आली आहे.

मुंबई

पश्चिम रेल्वेच्या लोकल स्टेशनवर स्टॅटिक क्लूआर कोडद्वारे पेपरलेस मोबाइल तिकीट बुकिंग बंद करण्यात आली आहे. रेल्वेच्या यूटीएस अॅपद्वारे स्टेशवर असलेले क्यूआर कोड स्कॅन करुन तिकीट काढण्याच्या सुविधेचा प्रवाशांकडून गैरवापर होत असल्याने रेल्वेने ही सुविधा बंद केली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.. 

रेल्वेच्या जिओफेन्सिंग क्षेत्रात मुंबई लोकलचे तिकीट काढण्यासाठी रेल्वेने अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे यूटीएस अॅप, २०१६ मध्ये यूटीएस अॅप सुरू केले. या अॅपद्वारे स्टेशनवर क्यूआर कोड स्कॅन करुन तिकीट काढता येते. परंतु, अनेक तिकीट नसलेले प्रवासी धावत्या ट्रेनमध्ये हे कोड स्कॅन करुन तिकीट काढत आहेत. त्यामुळे ही सेवा बंद करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

कोड वेबसाइटवर उपलब्धरेल्वेचे कोड इंटरनेटवरील अनेक वेबसाइटवर सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे तिकीट तपासणीस लोकलमध्ये येताच अनेक विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी तो कोड स्कॅन करुन तिकीट काढतात. तिकीट तपासणीसांकडून अशा वारंवार तक्रारी येत असल्याने ही सुविधा बंद केल्याचे अधिकारी म्हणाले. 

३० स्टेशनवर १२५ कोडपश्चिम रेल्वेवर ३० स्टेशन असून यावर १०० ते १२५ असे क्यूआर कोड असून ते आता निष्क्रिय केल्याचे अधिकारी म्हणाले. मध्य रेल्वेने देखील ही सुविधा तत्काळ बंद करण्यासाठी मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाला पत्र पाठवले आहे. 

स्टॅटिक ऐवजी बदलणारे क्यूआर कोड येणार- रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, सर्व स्टेशनवर डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून डायनॅमिक म्हणजे बदलणारे क्यूआर कोड उपलब्ध केल्यास अशा घटना रोखता येणे शक्य होणार आहे. - दरम्यान, याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक अभय सिंग यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई लोकलपश्चिम रेल्वे