मुंबई विद्यापीठाचे ‘सर्वोत्कृष्ट महाविद्यालय’ पुरस्कार जाहीर
By Admin | Updated: January 24, 2015 00:58 IST2015-01-24T00:58:47+5:302015-01-24T00:58:47+5:30
मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित असलेल्या महाविद्यालयांचे यंदाचे सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार शुक्रवारी जाहीर करण्यात आले.

मुंबई विद्यापीठाचे ‘सर्वोत्कृष्ट महाविद्यालय’ पुरस्कार जाहीर
मुंबई : मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित असलेल्या महाविद्यालयांचे यंदाचे सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार शुक्रवारी जाहीर करण्यात आले. चर्चगेट येथील के. सी. महाविद्यालय, भांडुप येथील रत्नम आणि विलेपार्ले येथील साठ्ये आणि वडाळा येथील बीपीसीए महाविद्यालयांना सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांचा बहुमान मिळाला आहे, तर ग्रामीण भागातील पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांना मिळाले आहेत.
महाविद्यालयांची शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा, अभ्यासक्रम आणि महाविद्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या आधारावर दरवर्षी मुंबई विद्यापीठातर्फे सर्वोत्कृष्ट महाविद्यालये पुरस्कार जाहीर करण्यात येतात. शहर-उपनगर आणि ग्रामीण अशी या पुरस्कारांची विभागणी करण्यात आली आहे. शहर-उपनगर भागातील पुरस्कार चार महाविद्यालयांना विभागून देण्यात आला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील आबासाहेब मराठे महाविद्यालय आणि लांजा येथील रावसाहेब गोगटे महाविद्यालयाला ग्रामीण भागातील सर्वात्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
मुंबई विद्यापीठाशी संबंधित नसलेले माजी कुलगुरू यांच्या अध्यक्षेतेखाली नेमण्यात आलेल्या समितीमार्फत संबंधीत महाविद्यालयांची विविध निकषांच्या आधारे निवड करण्यात आली आहे. दरम्यान, शहरी- उपनगरी विभागातील निवड झालेल्या महाविद्यालयांना प्रत्येकी रुपये ३५ हजार, तर ग्रामीण विभागातील निवड झालेल्या महाविद्यालयांना प्रत्येकी ३0 हजार रुपये रोख रकमेचे पारितोषिक दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)