लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई विद्यापीठाने पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला २५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पुनर्परीक्षा आणि पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर होण्यास विलंब झाल्याने काही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता होती. त्यामुळे विद्यापीठाने या प्रवेशांना मुदतवाढ देत विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा केला आहे.
विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये, मान्यताप्राप्त शिक्षणसंस्था आणि विद्यापीठ शैक्षणिक विभागाच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. मुंबई विद्यापीठामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर सामान्य गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा आहे. तसेच प्रवेश देऊनही जागा रिक्त राहिल्यास महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर गुणवत्ता यादी जाहीर करून विद्यार्थ्यांना प्रवेशित करावे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.
ऑनलाइन अर्जही भरणे अनिवार्य
अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्यातील संबंधित अभ्यासक्रमांसाठीचाही ऑनलाइन अर्ज भरणे अनिवार्य असणार असल्याचे शिक्षण विभागाने जारी केले आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्ज केल्यानंतर संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्याची प्रक्रिया २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी, असेही परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी नमूद केले.