Join us

मुंबई विद्यापीठाचा अर्थसंकल्प गोंधळात मंजूर! नियमांची पायमल्ली केल्याचा सिनेट सदस्यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 13:33 IST

सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई विद्यापीठाचा ९६८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प शनिवारी गोंधळात मंजूर झाला. यावेळी सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्याची वेळ विद्यापीठावर आली. व्यवस्थापन परिषदेत नियमांची पायमल्ली करत अर्थसंकल्प मंजूर झाल्याचा आरोप करून युवा सेना आणि ‘बुक्टु’ संघटनेच्या सिनेट सदस्यांनी सभागृहाच्या मध्यभागी ठिय्या आंदोलन केले. परिणामी, अर्थसंकल्पीय सिनेट अर्धा तास बाधित झाली.

व्यवस्थापन परिषद सदस्यांना अभ्यास करण्यासाठी अर्थसंकल्पाचा मसुदा किमान सात दिवस आधी देणे आवश्यक असते. मात्र १२ मार्चला झालेल्या परिषदेच्या अजेंड्यावर अर्थसंकल्प नव्हता. व्यवस्थापन परिषदेच्या नियमांची पायमल्ली करून अर्थसंकल्प मंजूर केला, असा आरोप युवासेना सिनेट सदस्य शीतल शेठ देवरुखकर यांनी केला. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच्या कामकाजावर आक्षेप घेऊन देवरुखकर यांनी लक्षवेधी मांडली. यावेळी विहित प्रक्रियेद्वारे अर्थसंकल्प व्यवस्थापन परिषदेत मांडल्याचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. यावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे जाऊन याची तक्रार करण्याची परवानगी द्यावी.

तोपर्यंत सभागृह तहकूब करावे, अशी मागणी युवासेना आणि बुक्टुच्या सदस्यांनी केली. मात्र परवानगी न दिल्याने त्यांनी प्रतिक्रियात्मक सभात्याग केला. सभागृहाच्या मध्यभागी येऊन ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे सभागृह १५ मिनिटे तहकूब करण्याची वेळ विद्यापीठावर आली. विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या प्रतिनिधींचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप युवासेना सदस्य प्रदीप सावंत यांनी केला.

यावेळी युवासेनेने ‘दादागिरी नहीं चलेगी, लोकशाहीचा खून करणाऱ्या प्रशासनाचा निषेध असो, तानाशाही नहीं चलेगी’ आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. प्रश्नांना बगल प्रश्नोत्तराच्या तासासाठी ३५ जणांचे ६५ हून अधिक प्रश्न होते. मात्र एकाच सदस्याच्या प्रश्नावर चर्चा झाली. यावेळी जाणीवपूर्वक अन्य सदस्यांचे प्रश्न टाळण्यासाठी चर्चा लांबवली. यातून विद्यार्थ्यांच्या  प्रश्नाला प्रशासनाने बगल दिली, असा आरोप सिनेट सदस्य शशिकांत झोरे यांनी केला.

रात्री उशिरापर्यंत ठिय्या

  • युवा सेना, बुक्टुच्या सदस्यांनी बैठकस्थळी छेडलेले आंदोलन उशिरापर्यंत सुरू होते. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी सदस्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र युवा सेना, बुक्टूने ती फेटाळली. १८ सिनेट सदस्य उशिरापर्यंत ठाण मांडून होते. 
  • आंदोलनस्थळी सायंकाळी पोलिस दाखल झाले होते. मात्र काही वेळानंतर ते माघारी गेले.सिनेट सदस्य यांची कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी आणि प्र. कुलगुरू प्रा. अजय भामरे यांनी भेट घेतली. मात्र अर्थसंकल्प विहित प्रक्रिया पार पाडून व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर करून घ्यावा आणि त्यानंतरच तो सिनेटमध्ये पुन्हा मांडावा यावर आंदाेलन करणारे सदस्य ठाम होते. त्यामुळे हा तिढा रात्री उशिरापर्यंत कायम होता. 
  • इतिवृत्तात इंग्रजी शब्दांचा भरणा

मराठी भाषेला राजभाषेची मान्यता मिळाली आहे. मात्र विद्यापीठाच्या जुलै २०२४ च्या बैठकीच्या इतिवृत्तात अनेक इंग्रजी शब्द वापरले होते. त्यावर आक्षेप घेत ते बदलण्याची मागणी प्रा. सखाराम डाखोरे यांनी केली. ही मागणी मान्य करून त्या सुधारणा करण्यास कुलगुरू प्रा. कुलकर्णी यांनी मान्यता दिली.

  • युवासेनेची फलकबाजी

मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत युवा सेनेने विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर शनिवारी आंदोलन केले. परीक्षा भवनातील गोंधळ, नादुरुस्त गाड्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचे अद्याप सुरू न केलेले काम, विद्यापीठाच्या पदव्यांवर चुकलेले नाव, आदी प्रश्नांवरून युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला घेरण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय सिनेटआधी फलकबाजी करत युवा सेनेने प्रशासनाला विविध प्रश्नांवरून जाब विचारला.

  • काळ्या कपड्यांद्वारे निषेध

विद्यापीठ प्रशासनाचा निषेध करण्यासाठी युवा सेनेचे सदस्य काळे कपडे परिधान करून सिनेट बैठकीला आले होते. विद्यापीठ प्रशासनाच्या कारभाराचा त्यांनी यावेळी निषेध केला. 

  • चहापानावरही बहिष्कार

विद्यापीठाच्या सिनेट बैठकीला दोन वर्षांनी पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले सदस्य उपस्थित असतील, हे गृहीत धरून त्यांच्याकडून प्रश्न मागविले होते. बैठकीच्या काही दिवसआधी या प्रश्नांची उत्तरे व वगळलेल्या प्रश्नांची माहिती प्रशासनाने सदस्यांना दिली. त्यानंतर सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत कुलगुरूंनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घातला होता.

टॅग्स :मुंबई विद्यापीठनिवडणूक 2024