Join us

Mumbai Train Update : आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी पाहा वेळापत्रक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 08:33 IST

विविध डागडुजीच्या कामांसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई : विविध डागडुजीच्या कामांसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवार, १५ डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण-दिवा अप जलद मार्गावर सकाळी ११.२५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी १०.५४ पासून ते दुपारी ३.५६ दरम्यान सुटणाऱ्या सर्व अप जलद गाड्या कल्याण ते ठाणे दरम्यान धिम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहेत.

या गाड्या सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. तर ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान या गाड्या पुन्हा अप जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत. या गाड्या १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत. तसेच सकाळी १०.१६ ते दुपारी ३.२१ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणा-या जलद मार्गावरील गाड्या नियोजित थांब्याशिवाय विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा येथेही थांबणार असून या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत.

हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.३० ते ४.०० दरम्यान मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. यादरम्यान अप मार्गावर पनवेल/बेलापूरवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ११.०६ ते ४.०१ दरम्यान सुटणा-या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून डाऊन मार्गावर १०.०३ ते ३.१६ पर्यंत सुटणा-या सर्व गाड्या बंद असणार आहेत.

तर सकाळी १० ते दुपारी ३.५३ पर्यंत पनवेल, बेलापूरवरून सुटणा-या ट्रान्स हार्बर मार्गावरील गाड्या आणि पनवेलसाठी सकाळी ११.१४ ते दुपारी ३.२० पर्यंत ठाणे येथून सुटणा-या गाड्या बंद राहणार आहेत. तर खारकोपरसाठी सकाळी ११.०२ ते दुपारी ३.३२ पर्यंत नेरूळ /बेलापूरवरून सुटणा-या गाड्या आणि नेरूळ /बेलापूरसाठी सकाळी ११.३० ते दुपारी ४.१६ वाजेपर्यंत खारकोपरवरून सुटणा-या गाड्या बंद असणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉकतर पश्चिम रेल्वेकडून रेल्वे मार्गावर सिग्नल आणि ओव्हरहेड वायर आदींच्या डागडुजीसाठी रविवारी चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान १०.३५ ते १५.३५ दरम्यान अप आणि जलद मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान सर्व गाड्या धिम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबईमुंबई लोकल