मुंबईत सकाळी झालेल्या रेल्वे अपघातात एका रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याच्या दुर्दैवी अंत झाला. सदर रेल्वे पोलीस कर्मचारी रात्री ड्युटी संपवून घराकडे जात असताना रेल्वेतून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला. विक्की मुख्यदल (वय, ३४) असे मृत्यू झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे. विक्कीच्या अपघाती निधनाने मुख्यदल कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकी हा ठाणे जीआरपीमध्ये कार्यरत होता. विक्की मूळचा जालना येथील रहिवाशी असून सध्या कल्याण येथे राहत होता. दरम्यान, आज सकाळी विक्की हा नाईट ड्युटी संपवून घराकडे निघाला. प्रचंड गर्दी असल्यामुळे तो लोकलच्या दरवाज्यातच उभा होता. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातावेळी तो खाली पडले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विक्की याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. विक्कीच्या पश्चात त्याची पत्नी आणि तान्हुले बाळ आहे. विक्कीच्या मृत्युची बातमी कळताच त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयासमोर टाहो फोडला.
विक्कीच्या मामाच्या मुलाने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, सकाळी आम्हाला विक्की रेल्वेतून खाली पडल्याचा फोन आला. त्यानंतर आम्ही ताबडतोब रुग्णालयात दाखल झालो. परंतु, तिथे विक्कीला मृत घोषित करण्यात आले. रेल्वेतून पडल्याने विक्कीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, अशी माहिती त्याने दिली.
मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलला भीषण अपघात झाला. या अपघातात १३ प्रवासी लोकलमधून खाली पडले. यामधील ४ जणांचा मृत्यू झाला. राहुल संतोष गुप्ता (वय, २८), सरोज केतन (वय, २३), विकी बाबासाहेब मुख्यदल (वय, ३४) आणि मयूर शाह अशी मृतांची नावे आहेत. तर, शिवा गवळी (वय, २३), आदेश भोईर (वय, २६), रिहान शेख (वय, २६), अनिल मोरे (वय, ४०), तुषार भागवत (वय, २२), मनीष सरोज (वय, २६), मच्छिंद्र गोतारणे (वय, ३९), स्नेहा धोंडे (वय, २१), प्रियंका भाटिया (वय, २६) अशी जखमींची नावे आहेत.