Join us

मीटर रिकॅलिब्रेशनसाठी उरला फक्त महिना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 06:29 IST

Mumbai Traffic News: मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) मार्चच्या अखेरपर्यंत १ लाख ९८ हजार ३६२ रिक्षा आणि १५ हजार ४७४ टॅक्सीचे रिकॅलिब्रेशन (नव्या भाडेदरानुसार मीटरमध्ये बदल) पूर्ण झाले आहे. एमएमआरमधल्या १० आरटीओ कार्यालयांमध्ये या गाड्यांचे रिकॅलिब्रेशन पूर्ण करण्यात आले.

 मुंबई  - मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) मार्चच्या अखेरपर्यंत १ लाख ९८ हजार ३६२ रिक्षा आणि १५ हजार ४७४ टॅक्सीचे रिकॅलिब्रेशन (नव्या भाडेदरानुसार मीटरमध्ये बदल) पूर्ण झाले आहे. एमएमआरमधल्या १० आरटीओ कार्यालयांमध्ये या गाड्यांचे रिकॅलिब्रेशन पूर्ण करण्यात आले. गेल्या साधारण दीड महिन्यात  नोंदणीकृत रिक्षा आणि टॅक्सींपैकी अनुक्रमे ४२ आणि ३३ टक्केच रिकॅलिब्रेशन पूर्ण झाल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) १ फेब्रुवारीपासून रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ केली. त्यामुळे नव्या भाडेदरांनुसार रिक्षा-टॅक्सींचे मीटर अद्ययावत करण्यास सुरुवात करण्यात आली. एमएमआरमध्ये ४ लाख ६७ हजार रिक्षा आणि ४६ हजार ८९८ टॅक्सी आहेत. सर्वाधिक रिकॅलिब्रेशन शहरी भागांमध्ये झाले आहे. त्यात उपनगरांमधील रिक्षा-टॅक्सींची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे उर्वरित लाखो गाड्यांचे रिकॅलिब्रेशन एक महिन्यात शक्य नसल्याने मुदतवाढची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस अनिल झोळेकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

अन्यथा प्रतिदिन ५० रुपये दंडमीटर अद्ययावत करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदत आहे. मुदतीत रिकॅलिब्रेशन पूर्ण झाले नाही तर प्रतिदिन ५० रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. जास्तीतजास्त ५००० पर्यंत दंडमर्यादा आहे. त्यामुळे सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी लवकर रिकॅलिब्रेशन पूर्ण करावे असे आवाहन एमएमआरटीएचे सचिव भारत कळसकर यांनी केले आहे. 

टॅग्स :मुंबईवाहतूक कोंडीआरटीओ ऑफीस