Join us
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षात मुंबईची पूलकोंडीतून सुटका; गोखले, कर्नाक, विक्रोळीतील नवीन पुलांचे काम लवकरच लागणार मार्गी

By सीमा महांगडे | Updated: January 1, 2025 14:43 IST

विक्रोळी उड्डाणपूल मार्च, गोखले पूल एप्रिल आणि कर्नाक पूल मे २०२५ पर्यंत पूर्ण होऊन सेवेत येईल, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मुंबई : नवीन वर्षात मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे. गोखले, कर्नाक, विक्रोळी आदी नवीन पुलांची कामे नवीन वर्षात पूर्ण होतील, असे संकेत महापालिकेकडून मिळत आहेत. त्यामुळे प्रवास आणखी वेगवान होणार आहे.

विक्रोळी उड्डाणपूल मार्च, गोखले पूल एप्रिल आणि कर्नाक पूल मे २०२५ पर्यंत पूर्ण होऊन सेवेत येईल, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. भायखळा आणि बेलासिस पूलही नवीन वर्षात मुंबईकरांसाठी खुले होतील, अशी अपेक्षा आहे. मुंबईतील धोकादायक  झालेल्या तीन पुलांची पालिकेकडून पुनर्बांधणी सुरू आहे. त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवल्याने कोंडी होत आहे.

गोखले पुलाला मिळणार जोड  रेल्वे हद्दीतील भाग धोकादायक बनल्याने गोखले पुलाचे काम हाती घेण्यात आले. ७ नोव्हेंबर २०२२ पासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम पालिकेकडून हाती घेतानाच टप्प्याटप्प्याने पूल सुरू करण्यात आला.

आता पुलाचे पूर्व ते पश्चिम मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पोहोचरस्त्यांचे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होऊन पूर्व ते पश्चिम मार्ग सुरू होणार आहे. या पुलाला बर्फीवाला पुलाची जोडही दिली जात आहे. ही जोडणीही एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण होईल.

‘हा’ पूल जूनमध्ये खुला करण्याचे नियोजन - मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरील १५४ वर्ष जुन्या कर्नाक पुलाची पालिकेकडून पुनर्बांधणी सुरू आहे. यात ५१६ मेट्रिक टन वजनाचा दक्षिण बाजूचा गर्डर रेल्वे भागावर ठेवण्यात आला आहे, तर दुसऱ्या बाजूच्या गर्डरचे सुटे भाग प्रकल्पाच्या ठिकाणी दाखल झाले आहेत.- पूर्व आणि पश्चिम दिशेचे पोहच रस्त्यांसाठी खांब बांधणीचा पहिला टप्पा १५ मार्च २०२५ पर्यंत, १७ एप्रिल २०२५ पर्यंत खांब उभारणी पूर्ण करणे, ३ मे २०२५ पर्यंत पोहोच रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि १ जून २०२५ रोजी भार चाचणी करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. - वेळापत्रकानुसार अपेक्षित कार्यवाही पूर्ण झाल्यास ५ जून २०२५ पर्यंत हा पूल वाहतुकीस खुला करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.

विक्रोळीत मार्चची डेडलाइन- विक्रोळी रेल्वेस्थानकातील फाटक ओलांडून अनेक जण पूर्व-पश्चिम प्रवास करत होते. एप्रिल २०१८ मध्ये पालिकेने येथे पूल बांधण्यासाठी कार्यादेश काढून एका कंपनीला काम दिले.- जलद बांधकामासाठी पुलाच्या आराखड्यात अनेक बदल करण्यात आले आणि पुलाची रखडपट्टी सुरू झाली. साधारण २०२०च्या सुरुवातीला पुन्हा महत्त्वाच्या कामांना सुरुवात झाली. सर्व अडथळे दूर करून कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. 

टॅग्स :मुंबईवाहतूक कोंडी