Join us  

मुंबईत पुद्दुचेरी एक्स्प्रेसला धडकली गदग एक्स्प्रेस, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 5:33 AM

दादरहून पुद्दुचेरीला निघालेल्या एक्स्प्रेसचे शेवटचे तीन डबे रात्री दहाच्या सुमारास माटुंगा स्टेशनजवळील क्रॉसिंगपाशी घसरले.

मुंबई :  

दादरहून पुद्दुचेरीला निघालेल्या एक्स्प्रेसचे शेवटचे तीन डबे रात्री दहाच्या सुमारास माटुंगा स्टेशनजवळील क्रॉसिंगपाशी घसरले. त्याचवेळी दादरच्या दिशेने येणारी गदग एक्स्प्रेस तिला धडकल्याने मोठी दुर्घटना घडली. मात्र रविवारचे वेळापत्रक लागू असल्याने आणि दोन्ही गाड्यांत फारशी गर्दी नसल्याने जीवितहानी झाली नाही. सुरक्षेचा उपाय म्हणून चारही मार्गांवरील ओव्हरहेड वायरचा वीजपुरवठा बंद केल्याने सर्व वाहतूक ठप्प झाली. रात्री पावणेअकराला धिम्या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र दोन्ही जलद मार्ग पूर्णतः बंद होते. 

घरी परतणाऱ्या प्रवाशांना या दुर्घटनेचा मोठा फटका बसला. दादरहून मुंबईच्या आणि माटुंग्याहून कुर्ल्याच्या दिशेने गाड्यांचा रांगा लागल्या होत्या. अनेक प्रवासी रेल्वे रूळांत उतरून अंधारातच जवळचे स्थानक गाठत होते.  

मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, दादर रेल्वे स्थानकातून दादर-पद्दुचरी एक्सप्रेस रात्री पावणे दहाच्या सुमारास सुटली आणि तिचे शेवटचे तीन डबे घसरले. तिला शेजारच्या मार्गावरून येणाऱ्या गदग एक्सप्रेसची धडक बसली. कामावरून घरी परतण्याच्या वेळेला हा अपघात घडल्याने कुर्ल्यापासून पुढे जाणाऱ्या सर्व प्रवाशांना याचा मोठा फटका बसला. सर्व मार्ग बंद झाल्याने तास-दीड तास सर्व प्रवासी ठिकठिकाणच्या स्थानकांवर प्रवासी अडकून पडले. 

दादर-पुद्दुचेरी एक्सप्रेसला अपघात झाला असून यात तीन डबे रुळावरून घसरले आहेत. ते रुळांवर आणण्याचे काम सुरु आहे. हा नेमका अपघात कसा झाला, ते तपासानंतर समोर येईल. - ए. के. सिंग, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

अपघातामागील दोषी व्यक्तींवर त्वरित कारवाई करावी. कोट्यवधी रुपये खर्च करूनही मुंबईकरांचा रेल्वे प्रवास सुरक्षित कधी होणार? मुंबईबाहेरून येणाऱ्या अधिकाऱ्यांना मुंबईच्या समस्यांविषयी माहिती नसते. हेच कारण मुंबईच्या मुळावर आले आहे. - मधू कोटीयन, अध्यक्ष, मुंबई रेल प्रवासी संघ

मध्य रेल्वे बंद पडल्याने प्रवाशांनी पर्याय म्हणून बेस्ट, टॅक्सीसारख्या पर्यायी वाहतुकीचा आधार घेतला. मात्र ही सेवा पुरेशी नसल्याने प्रवासी त्रासून गेले. शिवाय रस्त्यांतही ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. 

टॅग्स :रेल्वे