मुंबई - मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांतील प्लॅटफॉर्मवर छप्पर नसल्याने तळपत्या उन्हात उभे राहून लोकलची वाट पाहण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, भांडुप यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर अनेक महिन्यांपासून सुरू असलेली विकासकामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. तर, मस्जिद स्टेशनवर प्रवेश करताच छप्पर नसल्याने प्रवासी कमालीचे त्रस्त झाले आहेत. आम्ही उन्हात उभे राहण्याची शिक्षा आणखी किती दिवस भोगायची, असा संतप्त सवाल प्रवासी करत आहेत.
सध्याच्या वाढत्या तापमानामुळे मुंबई आणि उपनगरांमधील नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत मध्य रेल्वेच्या काही स्थानकांवरील प्लॅटफॉर्मवर छप्परच नसल्याने प्रवासी अक्षरशः घामाघूम होत आहेत. घाटकोपर स्थानकात प्लॅटफॉर्मच्या डागडुजीचे काम सुरू असल्याने प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. परिणामी, गर्दीच्या वेळी त्यांची स्थिती अत्यंत बिकट होते.
कुर्ला स्थानकातही असेच चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी कामे सुरू नसली, तरी तिथले छप्पर काढून टाकण्यात आले आहेत. मस्जिद स्थानकात पायऱ्या उतरताच छप्पर गायब असल्याने सावलीचा आधारही मिळत नाही. मुलुंड स्थानकाचीही परिस्थिती फारशी वेगळी नाही. प्रवासी विशेषत: महिला, ज्येष्ठ नागरिक छप्पर असलेल्या ठिकाणी सावलीत उभे राहतात. मात्र, लोकल आल्यानंतर डबा पकडण्यासाठी त्यांची धावाधाव होते. त्यामुळे मोठी गैरसोय होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ऊन, गर्दीमुळेही आरोग्यावर परिणामाची भीती ऊन आणि गर्दीमुळे प्रवाशांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असून, प्रशासनाने ही कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
उन्हामुळे घरापासून स्टेशनपर्यंत येताना अगोदरच दमछाक होत आहे. त्यात ट्रेन नेहमी उशिराने येत असल्याने प्लॅटफॉर्मवरही उन्हात ताटकळत राहावे लागते. काही ठिकाणी पंखे आहेत, पण त्याचीही म्हणावी तितकी हवा लागत नाही.- ममता पालव, प्रवासी
रेल्वेने अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत अनेक स्टेशनांवर दुकाने तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यातच कंत्राटदारांनी एकाच वेळी अनेक स्टेशनांमध्ये कामे सुरू केली आहेत. मात्र, ज्या स्टेशनमध्ये कामे पूर्ण झाली आहेत, तिथेही छप्परही बसवलेली नाहीत. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. - सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद
मध्य रेल्वे मार्गावर दररोज ३५ ते ३८ लाख प्रवासी प्रवास करतात. स्थानकांवर सुरू असलेल्या विकासकामांमुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही फलाटांवर ५० ते १०० मीटरपर्यंत छत नसल्याने उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे.
पिण्याच्या पाण्याची कुर्ला येथे बोंब? मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांत पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था असली, तरी प्रत्यक्षात तिथे पाणीच उपलब्ध नसते. कुर्ला स्थानकात पाणपोयी उभारली आहे, पण तेथील नळातून पाण्याचा थेंबही येत नाही.