Join us  

मुंबई : एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 11:16 AM

एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली आहे. यात 22 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई - मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाली आणि या दुर्घटनेत 22 जणांनी प्राण गमावले असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. एकूण  39 जण जखमी झाले आहेत. जखमींना केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांमध्ये 13 पुरुष, 8 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती आहे. आज शुक्रवारी (29 सप्टेंबर) सकाळी 10.45  वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.  पूल पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवेमुळे लोकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. यावेळी पुलावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला आणि चेंगराचेंगरी झाली. तर एका व्यक्तिच्या सांगण्यानुसार प्रचंड गर्दीच्यावेळी एक माणूस काहीतरी उचलण्यासाठी खाली वाकला असता, मागच्या लोंढ्यामुळे तो ढकलला गेला व पडला. यानंतर त्याठिकाणी मागच्या लोंढ्यांमुळे चेंगराचेंगरी झाली आणि परिस्थिती खूपच बिकट झाली.

दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश 

मुंबईतील एलफिन्स्टन -परळ स्थानकाला जोडणाऱ्या रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे. तसेच घटनेतील मृतांबद्दल दुःख व्यक्त केले आहे. जखमींची प्रकृती सुधारावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही ते म्हणाले. दरम्यान, या घटनेनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री पियूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले आहे. 

तर, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जखमींना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींवर मोफत उपचार होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.  शिवाय, घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचंही ते म्हणालेत.

दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा - शिवसेनाएल्फिन्स्टन स्टेशनच्या पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेवरुन शिवसेनेने मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. एलफिन्स्टनवरील पुलाबाबत मी रेल्वे मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला, मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही, असा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला असून चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान,  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केईएम रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.

विरोधकांनी सरकारला घेरलं

मुंबईकरांचा बळी घेणा-या सरकारचा धिक्कार असो - चित्रा वाघ, राष्ट्रवादी नेत्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार माजीद मेमन यांनी चेंगराचेंगरी प्रकरणी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या प्रबंधकांसह रेल्वे मंत्र्यांवर याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

श्वास गुदमरल्याने आणि त्याचवेळी अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने बहुतेकांना जीव गमवावा लागल्याची माहिती एका वरिष्ठ डॉक्टरने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली

 

केईएम रूग्णालयाबाहेर राजकीय कार्यकर्त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना धक्काबुक्की केली.

दुर्घटनेतील मृतांची नावेमसूद आलमशुभलता शेट्टीसुजाता शेट्टीश्रद्धा वरपेमीना वरुणकरतेरेसा फर्नांडिसमुकेश मिश्रासचिन कदममयुरेश हळदणकरअंकुश जैस्वालसुरेश जैस्वालज्योतिबा चव्हाणरोहित परबअॅलेक्स कुरियाहिलोनी देढीयाचंदन गणेश सिंहमोहम्मद शकील

रेल्वेचा नव्या गाड्यांच्या फेर्‍यांच्या शुभारंभाचा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला त्यानंतर  रेल्वेमंत्री पियुष गोयल व मुंबई  भाजपाध्यक्ष आशिष शेलार केईएममध्ये दाखल झाले.

दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अपघाती प्रवाशांबाबत सर्व योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे.  - जयजित सिंग, अप्पर पोलीस महासंचालक रेल्वे पोलीस

'अफवांनी घेतला निरपराध मुंबईकरांचा बळी'ब्रिज कोसळतोय, आग लागली आहे, अशा अफवांमुळेच एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावरील दुर्घटना घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. वर्दळीच्या वेळी झालेल्या गोंधळामुळे चेंगराचेंगरी झाली आणि निष्पाप प्रवाशांना जीव गमवावा लागला, अशी संतप्त प्रतिक्रिया काही स्थानिकांनी दिली आहे.

मुंबई पोलिसांनी जारी केले हेल्पलाईन क्रमांककेईएम हॉस्पिटल : 022-24107000वेस्टर्न रेल्वे कंट्रोल रूम : 022-23070564, 022-23017379, 022-23635959मुंबई रेल्वे कंट्रोल रूम : 022-23081725ट्रॅफिक हेल्पलाइन व्हॉट्सअॅप नंबर : 8454999999

नेमके काय घडले?

सकाळपासूनच मुंबई शहरात कोसळणाऱ्या पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. यावेळी परेल आणि एलफिन्स्टन रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या पुलावर प्रचंड गर्दी झाली होती. यादरम्यान पुलावरील पत्र्याचा काही भाग खाली कोसळल्याचे वृत्त समोर आले. मात्र पूल सुरक्षित होता. पण या घटनेदरम्यान प्रवाशांमध्ये पूल पडल्याची अफवा पसरल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि याचे रूपांतर चेंगराचेंगरीत झाले. नेमका याचसुमारास जोरदार पाऊस पडला आणि अनेक प्रवासी बाहेर न जाता खोळंबले होते. त्यात नवीन येणारी प्रत्येक गाडी हजारो प्रवासी या दोन्ही स्टेशनांवर येत होते. त्यामुळे थोड्याच वेळात या स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली. त्यात झालेल्या लहान घटनेमध्ये पूल पडल्याच्या अफवेची भर पडली. काहीजणांनी शॉर्ट सर्किट झाल्याची बोंब ठोकली. या सगळ्याचा विपरीत परिणाम होत प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि चेंगराचेंगरीची तीव्रता वाढली.

अफवांवर विश्वास ठेवू नका

अग्निशमन दल आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे. वाहतूक आणि प्रवाशांसाठी हा पूल तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, पूल पडल्याच्या किंवा शॉर्ट सर्किटच्या कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

कोट्यवधी खर्च करुन उभारला होता पूल

रेल्वे प्रशासनाने परळ येथे कोट्यवधी खर्च करून पादचारी पूल उभारला आहे. हा पूल दादरच्या दिशेला जाणारा आहे.  या पुलाचा वापर होणार नाही, त्यामुळे हा पैशांचा अपव्यय ठरेल, अशी प्रतिक्रिया स्थानिकांसह नागरिकांनी दिली होती. मात्र रेल्वे प्रशासनाने नागरिकांच्या प्रतिक्रियांना केराची टोपली दाखवून पूल उभारला. यामुळे मुंबई दिशेकडील पुलावरील प्रत्यक्ष गर्दी जैसे थेच राहिली होती. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला आता तरी जाग येईल का? , असा सवाल संतप्त स्थानिकांकडून विचारण्यात येत आहे.

52 कोटींचा प्रकल्प आता तरी पूर्ण होणार परेल टर्मिनस प्रकल्यासाठी 52 कोटी खर्च अपेक्षित आहे, हा प्रकल पूर्ण झाल्यास लोकांना याचा फायदा होणार आहे. प्रकल्पाचे काम सुरू झाल्यास साधारण 18 ते 20 महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र रेल्वे प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे 4 वर्षाहून अधिक काळापासून हा प्रकल्प रखडलेला आहे.

डोंबिवलीमध्येही अशीच असते परिस्थिती केवळ एल्फिस्टन नाही तर मध्य रेल्वेच्याही ठाणे, डोंबिवली, आसनगाव, बदलापूर, शहाडसारख्या स्थानकातदेखील संध्याकाळीच्या वेळेस अशीच चेंगराचेंगरीची स्थिती असते. या संदर्भात डोंबिवली स्थानक प्रशासनाला प्रवासी संघटनांनी व प्रवाशांनी निवेदनदेखील दिलेले आहे.ठाणे, डोंबिवली, कल्याण स्थानकात मोठे ब्रीज बांधले आहेत पण तरीही जुन्या छोट्या ब्रिजवर गर्दी होतेच. अनेक प्रवाशांना ते सोयीचे पडतात, अशी त्यांची भावना आहे. डोंबिवली- ठाणे स्थानकातील त्या दोन्ही ब्रिजचे देखभालीचे काम करण्यात येते पण फुटफॉल प्रचंड असल्याने ब्रिजचं काम नव्याने व्हावं, अशीही मागणी करण्यात येते आहे.

दरम्यान, दिवा स्थानकातदेखील असाच अनुभव प्रवाशांना साधारण 10 दिवसांपूर्वी आला होता. प्रचंड पाऊस पडत होता, त्यावेळी मुबंई दिशेकडील ब्रिजच्या लँडिंगवर चेंगराचेंगरीची स्थिती झाली होती. प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अॅड. आदेश भगत यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी तातडीने आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांना सतर्क केले होते 

माणुसकीचा मदतीसाठी पूर : जखमींना रक्तदान करण्यासाठी नागरिकांची केईएम हॉस्पिटलमध्ये गर्दी

 

टॅग्स :अपघातमध्ये रेल्वेपश्चिम रेल्वेएलफिन्स्टन चेंगराचेंगरी