मुंबई : एकीकडे बॉलीवूड कलावंतांनी सरत्या दीड वर्षात मुंबईत ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक ही रिअल इस्टेटमध्ये केल्यानंतर आता दक्षिण भारतातील चित्रपटसृष्टीलाही मुंबईने भुरळ घातल्याचे चित्र आहे. दक्षिणेतील अनेक प्रमुख सिने-कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांनी सरत्या वर्षात मुंबईत १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्याचे दिसून आले आहे. या कलाकारांनी घरांची, तर काही निर्मात्यांनी कार्यालयांची खरेदी देखील केली आहे.
राजा आणि पृथ्वीराज सुकुमारन यांनी घेतले फ्लॅट
दक्षिणेतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते के. ई. गणावेल राजा यांनी अलीकडेच अंधेरी पश्चिमेला १५ कोटी रुपयांना३४१४ चौरस फुटाच्या फ्लॅटची खरेदी केली आहे.
मल्याळी अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांनी देखील पाली हिल परिसरात २९७० चौरस फूटाचा फ्लॅटची ३० कोटी ६० लाखांना खरेदी केल्याची माहिती आहे. त्यांनी यापूर्वी देखील येथे १७ कोटींचा फ्लॅट खरेदी केला होता.
माधवन, रश्मिकाची खरेदी
पाली हिल परिसरात बॉलीवूडच्या अनेक कलाकारांची घरे असून, त्या परिसरात घरांच्या विक्रीचे प्रति चौरस फूट दर एक लाख रुपयांच्याही पुढे पोहोचले आहेत.
बॉलीवूड आणि दक्षिणेतही लोकप्रिय असलेले अभिनेते आर. माधवन यांनी देखील मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात ४१८२ चौरस फूट आकारमानाचा फ्लॅट १७ कोटी ५० लाख रुपयांना खरेदी केला आहे.
अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि समान्था रुथ प्रभू यांनी देखील कोट्यवधी रुपये खर्च करत मुंबईत घर खरेदी केले आहेत.
बांधकाम क्षेत्रात पुन्हा एकदा तेजी
कोरोना काळानंतर मुंबईतील बांधकाम क्षेत्रात पुन्हा एकदा तेजी निर्माण झाली असून, गेल्या तीन वर्षांपासून वर्षाकाठी सरासरी १० टक्क्यांनी घरांच्या, तसेच कार्यालयांच्या किमती वाढत आहेत.
बॉलीवूड प्रमाणेच दक्षिण भारतातील कलाकार देखील मुंबईत गुंतवणूक करण्यावर भर देत असल्याचे विश्लेषण केले जात आहे.
अनेक कलाकारांचे वारंवार मुंबईत मीटिंग आणि शूटिंगसाठी येणे होत असल्यामुळे हॉटेलमध्ये राहण्याऐवजी मुंबईत घर करण्याकडे कलाकारांचा कर असल्याचे देखील मत एका निर्मात्याने व्यक्त केले.