Join us  

Mumbai rains updates: मुंबईसह उपनगरांत 'जोर'धार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2018 6:55 AM

मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत ठिकठिकाणी संततधार सुरु आहे.

मुंबई : काही दिवसांच्या उसंतीनंतर पावसाने कालपासून आपला जोर कायम ठेवला. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत ठिकठिकाणी संततधार सुरु आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पडलेल्या पावसाने मुंबईकरांना चांगलेच झोडपून काढले. याचबरोबर, काही सखल भागात पाणी  साचले आहे. तसेच, पावसामुळे रस्त्यांवरील वाहतूक मंदावली आहे. मात्र लोकल सेवेवर अद्याप कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसून येते.  

दरम्यान, बुधवार 4 जुलै रोजी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.  जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्याच्या सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने हजेरी लावली असतानाच, जून महिन्याच्या नोंदीनुसार मुंबईत ७९५.५ मिलीमीटर पाऊस पडला आहे. गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत या वर्षी जूनमध्ये पडलेला पाऊस समाधानकारक आहे. 

जून महिन्यातील दोन आठवड्यांतील शनिवारसह रविवारी पावसाने धुमाकूळ घातला होता. एका आठवड्यातील सोमवारी पडलेल्या पावसाने मुंबईचा चक्का जाम केला होता. दोन आठवड्यांतील शनिवार, रविवार आणि तुफान पावसाचा सोमवार वगळता, उर्वरित दिवस मुंबईत पावसाने मान्सूनच्या तुलनेत विशेष जोर धरला नाही. उलटपक्षी पावसाने उघडीप घेतल्याने, मुंबईकर उन्हासह उकाड्याने बेजार झाले होते. महत्त्वाचे म्हणजे, अतिमुसळधार पावसाच्या नोंदीनंतर मुंबईसाठी तीन दिवसांकरिता देण्यात आलेला अतिमुसळधार पावसाचा इशाराही भारतीय हवामान शास्त्र विभागाने मागे घेतला होता. परिणामी, अनेक दिवसांआड पडलेल्या पावसानुसार जून महिन्यात मुंबईत ७९५.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :मुंबईपाऊस