Join us  

Mumbai Rains : मुंबईत 150 अतिरिक्त पाणी उपसा पंप बसवलेत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 12:56 PM

मुंबई व कोकण भागातील अतिवृष्टीत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

नागपूर - मुंबई व कोकण भागातील अतिवृष्टीत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबई व कोकण भागात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी प्रशासन यंत्रणा सजग आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. मुंबईमध्ये पाणी उपसा करण्यासाठी 150 अतिरीक्त ड्रेनेज पंप लावण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर अकरावी व बारावीच्या प्रवेशासाठीच्या प्रक्रियेला देखील गरज पडल्यास मुदतवाढ देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य अजित पवार, आशिष शेलार यांनी यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई व कोकण भागत अतिवृष्टी होत आहे. पालघर जिल्ह्यात प्रचंड पाऊस पडत आहे. जिल्हा प्रशासन अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. 

मुंबईत अतिवृष्टीमुळे 11 ठिकाणी पाणी तुंबले असून तीन ठिकाणी रस्ते वाहतूक वळवण्यात आली आहे. वसई विरारदरम्यान रेल्वे वाहतूक बंद असून अन्यत्र मात्र लोकल सेवा सुरू आहे. रस्ता वाहतूक धीम्या गतीने सुरू आहेत. पावसाचे पाणी उपसा पूर्ण क्षमतेने होत असून 150 अतिरिक्त पंप लावण्यात आले आहेत. भरती काळात अधिक सजग राहण्यास प्रशासनास सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्याबाबत शिक्षणमंत्र्यांनी आढावा घ्यावा. गरज पडल्यास अकरावी व बारावीच्या प्रवेशप्रक्रियेस मुदतवाढ देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटदेवेंद्र फडणवीसदेवेंद्र फडणवीसमुंबई